नव्या पिढीने धर्मवीर आनंद दिघे चित्रपट पाहून, खरा राजकारणी कसा असावा याचा अभ्यास करावा : प्रसाद ओक

नितीन ननावरे यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चित्रपटाच्या खास शोचे आयोजन
कोथरुड : आनंद दिघे साहेबांचे काम इतके मोठे आहे कि ते नव्या पिढीसमोर आणि जगासमोर यावे या उदात्त हेतूने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. नव्या पिढीने हा चित्रपट पाहावा आणि खरा राजकारणी कसा असावा याचा अभ्यास करावा असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.
धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या खास शोचे आयोजन नक्षत्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन ननावरे यांच्या वतीने कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते, अभिनेते मंगेश देसाई, झी स्टुडिओचे महेश कुलकर्णी, अश्विन पाटील, चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे अभिनेते क्षितिज दाते, क्रिकेटपटू केदार जाधव, नक्षत्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन ननावरे व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी श्रुती गावडे हिने धर्मवीर आनंद दिघे या शब्दांचा वापर करून तयार केलेले छायाचित्र प्रसाद ओक यांना भेट दिले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व चित्रपटातील कलाकारांचा सन्मान करून चित्रपटाला सुरुवात करण्यात आली.










तत्पूर्वी बोलताना प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे या चित्रपटाच्या खास शोचे आयोजन केल्याबद्दल नक्षत्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन ननावरे यांचे आभार मानले. ते म्हणाले धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा छोटा नाही तो पाहिल्यानंतर त्याचा आवाका किती मोठा आहे हे तुम्हाला कळेल. चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून सर्व शो हाऊसफुल होत असल्याने त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.
मंगेश देसाई म्हणाले हा चित्रपट म्हणजे केवळ एका राजकारणी व्यक्तीचा नसून गुरू-शिष्याच्या अतूट नात्याचाही आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाते कसे होते हे दाखवण्यात आले असून एक व्यक्ती समाजातील गरजूंच्या मदतीला धावून जातो त्यांच्यासाठी तो काय काय करतो, अशा आदर्श राजकारणी व्यक्तिमत्त्वावर हा चित्रपट आहे.
यावेळी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदुत्वाने प्रेरित झालेल्या, समाजातील दिनदुबळ्या लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या, समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जीवनप्रवास कळवा यासाठी या खास शोचे आयोजन करण्यात आल्याचे नितीन ननावरे यांनी सांगितले.






