मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न : वसंत मोरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त करत, मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप केला आहे. काही जणांना मी पक्षात नकोय. मनसेच्या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील माझं नाव नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र हा मेळावा सुरू झाल्यानंतर वसंत मोरेंची अनुपस्थिती दिसून आल्याने विविध चर्चां रंगू लागल्या होत्या. अखेर मेळावा सुरू झाल्याच्या जवळपास अर्धा तासानंतर वसंत मोरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
वसंत मोरे म्हणाले की, “मी येणार नव्हतो असं काहीच नाही, मी असं काही बोललोच नव्हतो. मात्र मेळाव्याची जी पत्रिका आहे, त्यात कोअर कमिटीच्या दहा जणांचीच नावे होती आणि मी अकरावा आहे माझं त्यात नाव कुठल्याच कार्यक्रमात नव्हतं. मी रात्री देखील सांगितलं होतं की मला मेळाव्याला यायचं आहे, रात्री उशीरा माझ्याकडे ती कार्यक्रम पत्रिका आली त्यामध्ये वेळापत्रकात माझं नाव नव्हतं. त्यानंतर आता मला शहराध्यक्षांचा फोन आला होता.”
तुम्हाला डावललं जात आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “होय, तसं वारंवार घडतय.मी याबाबत अनिल शिदोरे यांना कळवले आहे. या सगळ्या गोष्टी मला जिथे सांगायच्या तिथे सांगितल्या आहेत.”
आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसेल असं वाटत नाही का? यावर त्यांनी शक्यता आहे, असं सांगितलं. तर, आपली पुढची भूमिका काय असणार आहे? यावर ते म्हणाले, “माझी भूमिका सुरुवातीपासूनच पक्षासोबत आहे. मी कुठे पक्षाच्या बाहेर पडलोय? फक्त मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षामध्ये नकोय. मला डावलून राज ठाकरे यांच्यासमोर वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.”
एका कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी बोलल्याचं दिसून आलं होतं. यावर बोलताना वसंत मोरेंनी सांगितलं की, “रोहित पवार मला म्हणाले की, तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली तुम्ही मनसेत राहिलात. त्यांनी मला ऑफर दिलेली नाही, उलट त्यांनी सांगितल की तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतली ते बरोबर केलं.” यावर मी त्यांना म्हणालो की, “मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं होतं की मनसेत आहे आणि मनसेतच राहील.” अशी माहिती वसंत मोरे यांनी माध्यमांना दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या बाबत भूमिका मांडल्यावर वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी काही तासात त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून बाजूला केले. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.




