लायगुडे हॉस्पीटल मधील बंद केलेले स्वॅब टेस्ट सेंटर सुरू करा

लायगुडेमध्ये ऑक्सिजन बेड्स सुरू करण्याची मागणी
पुणे : शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता सिंहगड रोडवरील पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे हॉस्पीटल मधील बंद करण्यात आलेले कोरोना स्वॅब टेस्ट सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे तसेच ओपीडी व उपलब्ध असलेल्या खोल्या मध्ये ऑक्सिजन बेड्स सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे. सिंहगड रस्त्यावर लोकमत कार्यालयाजवळ पुणे मनपाचे प्रशस्त व भव्य इमारती मध्ये लायगुडे हॉस्पीटल आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या ठिकाणी या परिसरातील नागरिकांसाठी कोरोना स्वॅब टेस्ट सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हजारो नागरिकांची स्वॅब टेस्ट ची व्यवस्था झाली होती. परंतु हे सेंटर आता बंद केल्याने आजु बाजूच्या परिसरातील नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना पु. ल. देशपांडे उद्यानात स्वॅब टेस्ट साठी जावे लागत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.
प्रशासनाचा हे सेंटर बंद करण्यामागचा उद्येश काय हे समजत नाही. या हॉस्पीटल मध्ये सर्व सुविधा असताना कोणाच्या सांगण्या वरून व कशासाठी हे सेंटर बंद केले आहे असा प्रश्न ही ही उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.
हा परिसर शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या मोठी आहे. या हॉस्पीटलमध्ये रुग्णांसाठी कोरोना साठी आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स व आवश्यक असणारी सुविधा हॉस्पीटल सुरू करणे गरजेचे आहे. आज पुणे शहरात व उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आवश्यक बेड्स उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत या हॉस्पिटलच्या इमारतींमधील खोल्यामध्ये अद्ययावत कोविड सेंटर त्वरीत सुरू करावे. त्याच बरोबर ताबडतोब जे स्वॅब सेंटर बंद केलेले आहे ते सुरू करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांना याबाबत सुचना द्याव्यात अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.



