पुण्यात मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला भीषण आग तीन मजुरांचा मृत्यू

पुणे : नगर रोड येथील साई सत्यम पार्कजवळ शुक्रवारी मध्यरात्री एका मंडप सजावटीच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. उबाळेनगर गणेश पार्क येथील शुभ सजावट डेकोरेटर्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाच्या पाच तर पीएमआरडीएच्या चार अशा नऊ फायर गाड्या तसेच पाण्याचे टँकर यांच्या साह्याने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. या घटनेत दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याचा अंदाज आहे. दोन मृतदेह पूर्ण जळालेल्या अवस्थेत सापडले तर एक मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
आग इतकी भीषण होते की आगीमुळे सुमारे एक एकर परिसरातील गोडाऊन चार ही बाजूने पेटलेले होते. घटनास्थळी आठ कामगार होते मात्र आग लागल्यानंतर बाकीच्यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. इतर तीन कामगार आत अडकून राहिले होते. संपूर्ण आग विझवल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे तीन मृतदेह मिळाले. पुणे अग्निशमन विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन ड्युटी ऑफिसर विजय भिलारे व पीएमआरडीए चे विजय महाजन यांच्यासह सुमारे 30 जवानांनी ही भीषण आग आटोक्यात आणली. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे मात्र त्यांची ओळख पटलेली नाही. पोलीस तपास सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरक्षिततेच्या उपाययोजना आवश्यकच
इव्हेंट कंपनीच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे अशा घटनांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप मजुरांचा जीव जाऊ शकतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे.




