
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
पुणे : देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये प्लाझ्मादान उपक्रम सुरु केला आहे. त्याला कोथरुडकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, मंगळवारी 26 जणांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली.

यावेळी स्थानिक नगरसेविका अल्पना वर्पे यांनी देखील या उपक्रमात सहभागी होत प्लाझ्मादान साठी चाचणी केली. सध्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्लाझ्मा थेरपी उपयुक्त होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघात प्लाझ्मादान उपक्रमाची संकल्पना मांडली.
या उपक्रमाअंतर्गत ज्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, त्यांना प्लाझ्मादानासाठीचे आवाहन केले होते. त्याला कोथरुडकर जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी 26 जणांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी 40 हुन अधिक कोरोना योद्ध्यांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून अँटीबॉडी टेस्ट केली होती. त्यापैकी 20 कोव्हीड योद्धे हे प्लाझ्मादानासाठी पात्र ठरले होते. त्यातील 16 जणांनी प्लाझ्मादान केले आहे. तसेच गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६ वेळेत देखील अँटीबॉडी टेस्ट करण्यात येणार आहे. तरी इच्छुक दात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.



