ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे निधन

पुणे : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि बौद्ध साहित्य व मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर आधारित साहित्याची निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा(वय 87) यांचे आज (रविवारी) दुपारी वृद्धपकाळाने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, मानवतावादी समाजसुधारकांच्या विचारांचा एक मोठा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सोनग्रा यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सातत्याने मांडला.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत त्यांच्या विमान नगर येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता येरवडा विद्युत दाहिनी या ठिकाणी अंत्यविधी होईल.
संत कबीरांच्या विचारांवर आधारित ‘कबीर वाणी’ हा सोनग्रा यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या ग्रंथामधून त्यांनी प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि जीवनप्रवासाचा ठेवा असलेल्या ‘सोनजातक’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा १४ भागांचा संच साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरला.
आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यकृती व विषय
कबीर वाणी : संत कबीरांच्या विचारांवर आधारित ग्रंथ
तिमिरातुनी तेजाकडे : प्रबोधनाचा विचार
सोनजातक : त्यांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथांचा 14 भागांचा संच



