वारजेत महामार्गालगतचे सेवा रस्ते खड्डेमय ; दिपाली धुमाळ यांची दुरुस्तीची मागणी..

वारजे : वारजे डुक्कर खिंड ते वारजे हायवे चौक या टप्प्यात महामार्गालगत दोन्ही बाजूने असणाऱ्या सेवा रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले असल्याने पावसात सेवा रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत. तसेच काही ठिकाणी पूर्ण रस्त्यावर चर मारलेली आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू असून या खड्ड्यांमध्ये व खोदलेल्या ठिकाणी साठलेल्या पाण्यातून वाहने चालवताना नागरिकांची तारांबळ होत असून हायवे लगत असणाऱ्या सोसायट्यांमधील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.
शाळकरी मुले, महिला व जेष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त बाहेर पडणारे सर्व नागरिकांचे या खड्यांमुळे व रोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आतोनात हाल होत आहेत. काही ठिकाणी हायवे वरून दुचाकी वाहन चालकांनी अनाधिकृतपने डिव्हाईडर तोडल्याने हायवे वरून व सेवा रस्त्यावरून नागरिक येजा करत असतात त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे हायवे रस्त्याला व सेवा रस्त्याला जे अनाधिकृत पंक्चर केलेले आहेत ते त्वरित बंद करावेत व या दोन्ही सेवा रस्त्यावरील खड्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी धुमाळ यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.










