कर्वेनगरच्या वडार वस्ती, श्रमिक वसाहतीमध्ये एसआरए सर्व्हेदरम्यान वातावरण तंग..गोंधळाची स्थिती

मोठ्या पोलिस फौज फाट्यासह आले होते अधिकारी व विकासकाचे कर्मचारी
कर्वेनगर : कर्वेनगर मधील वडारवस्ती, श्रमिक वसाहतीमध्ये आज अचानक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एस आर ए) सर्व्हेसाठी पोलिस बंदोबस्तात एसआरए अधिकारी व बिल्डरची लोक आल्याने मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांकडून या सर्व्हेला व घर क्रमांक देण्याच्या कामाला प्रचंड विरोध करण्यात आला.
कर्वेनगरमधील वडारवस्ती, श्रमिक वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या कामाला विरोध करणारे फ्लेक्स या भागात लावण्यात आल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला होता. या वस्तीमध्ये झोपडपट्टी धारकांचे आग्रिमेंट करण्याचे काम गेले अनेक वर्ष चालू आहेत त्यातही अनेक गोंधळ असल्याचे सातत्याने चर्चेतून पुढे आले आहे.

आज सकाळी अचानक एसआरए अधिकारी व बिल्डर ची लोक मोठ्या पोलिस फौज फाट्यासह वस्त्यांमध्ये घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरत याला विरोध केला. यामुळे वातावरण चिघळले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी सुशील मेंगडे, विनोद मोहिते, राजाभाऊ बराटे, यांनी वस्तीत येऊन सुरू असलेला सर्व्हे थांबवला. त्यामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती निवळली.
विनोद मोहिते म्हणाले की, कोणती नोटीस, किंवा पूर्वसूचना न देता पोलिसांना घेऊन ही लोकं वस्तीमध्ये कसे घुसू शकतात. त्यांना वस्तीत दहशतीचे वातावरण निर्माण करायचे होते का ? या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे नेमकं कशासाठी करण्यात आलं. यामागे कोणाचा विशेष हेतू आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.






