तेजल दुधाने यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कर्वेनगर मधील निवडणूक रंगतदार होणार..

तेजल दुधाने यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम.. क गटात चुरशीच्या लढतीचे चित्र
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी प्रभाग क्रमांक 30 मध्ये लक्ष लागले होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कापण्यात आलेल्या तेजल दुधाने नक्की काय भूमिका घेणार याकडे..मात्र तेजल दुधाने यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत क गटातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कर्वेनगर मधील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तेजल दुधाने अपक्ष निवडणूक लढवणार असल्याने त्या लढत असलेल्या क गटातच नाही तर संपूर्ण प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी मधील निवडणुकीवर त्याचे परिणाम दिसून येतील असे बोलले जात आहे. तेजल दुधाने मागील अनेक वर्षापासून या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होत्या. आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून त्यांच्या पाठीमागे मोठे महिला संघटन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या या भागातील ओळख होत्या. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती, मात्र ऐनवेळेस त्यांची उमेदवारी कापण्यात आली.
उमेदवारी कापण्यात आल्यानंतर त्यांनी घेतलेला मेळाव्यात कर्वेनगर मधील अनेक महिला व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दर्शवला होता तर अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले होते. या मेळाव्यानंतर त्या अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात होते आणि आज अर्ज माघार घेण्याचे दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्या अपक्ष उमेदवार असणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
तेजल दुधाने अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या क गटात भाजप कडून तेजश्री महेश पवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवेदिता शैलेश जोशी, शिवसेनेकडून प्रतीक्षा जावळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मनिषा विरेश शितोळे, काँग्रेस- मनसे- शिवसेना (उबाठा) आघाडी कडून वैशाली दिघे या महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेजल दुधाने यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे या गटातील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा कर्वेनगर परिसरात आहे.






