चांदणी चौकातील अग्निशमन केंद्रास स्वर्गीय खासदार गिरीश बापट साहेबांचे नाव द्यावे ; अन्यथा उद्घाटन होऊ देणार नाही किरण दगडे पाटील

कोथरूड : पुणे महानगरपालिकेने चांदणी चौकात उभारलेले अत्याधुनिक अग्निशमन व प्रशिक्षण केंद्र पूर्णत्वास आले असून त्याला स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केली आहे. या केंद्रास बापट साहेबांचे नाव दिले नाही तर केंद्राचे उद्घाटन होऊ दिले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
किरण दगडे पाटील म्हणाले, या चांदणी चौकातील अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन सोहळा स्वर्गीय खासदार श्री. गिरीष बापट साहेब यांच्या हस्ते पार पडला होता. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या केंद्रासाठी निधी मंजूर करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता. या केंद्राच्या उभारणीसाठी बापट साहेबांनी प्रयत्न करून आपल्या कार्यकाळात पुणेकरांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. स्व. गिरीषभाऊ बापट साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच हे केंद्र आज येथे उभे आहे. दुर्दैवाने, बापट साहेब आपल्यात नसले तरी त्यांची लोककल्याणकारी कामे आजही आपल्याला प्रेरणा देतात.
त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून, या अग्निशमन केंद्रास स्वर्गीय गिरीष बापट साहेबांचे नाव देणे अत्यंत उचित ठरेल. मात्र या संदर्भात मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. लवकरात लवकर या केंद्रास बापट साहेबांचे नाव देण्याचा निर्णय घ्यावा. जर हा निर्णय घेतला गेला नाही, तर या केंद्राचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा किरण दगडे पाटील यांनी दिला आहे.

पौड रस्ता, भुसारी कॉलनी, बावधन, भूगाव, भूकुम हा भाग प्रचंड विस्ताराला आहे. या भागातील आगीसारख्या घटनांवर मात करण्यासाठी ही केंद्र महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे ज्यांच्या प्रयत्नातून हे केंद्र उभा राहिले आहे त्या स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांचे नाव देऊनच हे केंद्र सुरू करावे व या विषयाला गांभीर्याने घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी सूचना व इशारा किरण दगडे पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


