पुणे शहर

महापालिका अधिकाऱ्यांना असं तर वाटत नाही ना ? कालच्या पालिकेतील प्रकारानंतर अनेक प्रश्न होतात उपस्थित..

अमोल साबळे

पुणे : पुणे महापालिकेत साडेतीन वर्ष प्रशासन राजवट आहे म्हणून अधिकाऱ्यांना आपण मालक झालो आहोत असे वाटायला लागले तर नाही ना ? कारण जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या, प्रशासनाच्या चुकीच्या कारभारा विरोधात बोलणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना जर उच्च पदस्थ अधिकारी गुंड म्हणू लागले तर याचा अर्थ नक्की काय घ्यायचा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकाराची चर्चा जनमानसात सुरू असून वरील प्रश्न त्यातूनच पुढे येत आहेत.

कार्यकर्ता, राजकीय पदाधिकारी हा आक्रमक असतोच कारण जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकपणा दाखवला नाही तर प्रशासन ही जागे होत नाही हे त्याला चांगले माहीत आहे. त्यामुळे प्रश्न सोडवून घेण्यासाठी किंवा मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा त्याला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागतो. त्याने प्रश्न विचारले, आंदोलन केले तर तो गुंड होतो का ? ज्यांच्या विरोधात तो उभा राहतो त्यांना तसे वाटेल पण ज्यांच्यासाठी उभा राहतो त्यांच्यासाठी तो कार्यकर्ता एक आधार असतो.

Img 20250508 wa0001235733770892078245

काल पुणे महापालिकेत मनसे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या प्रकाराची चर्चा जोरदार सुरू आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीच्या संदर्भात काही मागण्यांसाठी हे पदाधिकारी गेले असताना मनसे नेते किशोर शिंदे व महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यात वाद झाला होता. यानंतर दोन्ही बाजूंनी आंदोलने झाली. महापालिका अधिकारी यांनी घेतलेल्या आंदोलनात एका अधिकाऱ्याने आम्ही पण काही बांगड्या भरल्या नाहीत असे म्हणतानाचे शब्द ऐकायला मिळाले. म्हणजे तुम्ही पण आता हाणामारी करणार का ? आणि त्यासाठी तुम्हाला जनतेच्या कररूपी पैशातून पगार द्यायचा का ? असा प्रश्न अशा वक्तव्यानंतर विचारला जाऊ लागला आहे. महापालिका निवडणूका झाल्या नसल्याने साडेतीन वर्ष यांना प्रश्न विचारणारा कुणी नाही, कोणी प्रश्न विचारलाच तर काल सारखी परिस्थिती. त्यामुळे महापालिकेचा प्रवास नक्की कुठल्या दिशेने सुरू आहे  असा एक सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनीतील बंगल्यातील महागडे सामान चोरीला गेल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला. हा प्रकार लपविण्याचा प्रकार पालिकेकडून सुरू होता पण माध्यमांमध्ये या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि चोरीचे बिंग उघडे पडले. आता याबाबत कोणी प्रश्न विचारणार असेल तर पालिका अधिकाऱ्यांना त्याला उत्तर द्यावेच लागणार आहे. 

कालचा प्रकार हा एका पक्षाच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित नाही. अशी अनेक तीव्र आंदोलनं प्रत्येक पक्षाकडून महापालिकेत या आधी झाली आहेत. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावं लागलं आहे. पण त्यावेळी  अधिकाऱ्यांनी आश्वासीत करून सामंजस्याने ही आंदोलने मिटवली आणि प्रश्न मार्गी लागले. कालच्या प्रकारात मग तणाव निर्माण का झाला ? पुढील काळात आंदोलने झाल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळी अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत का ? जनतेसाठी भांडणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कालच्या प्रकाराचा सजगपणे विचार करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये