पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार : सुतार

पुणे : पूर्वी पुणे शहरामध्ये छोटा-मोठा पाऊस आला तरी पाणी जमिनीत मुरले जायचे व उरलेले पाणी नाला मार्ग नदीला जाऊन मिळायचे परंतु मागील काही वर्षात पावसाळ्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येत आहे, सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये, वस्तीमध्ये बैठ्या घरांमध्ये पाणी शिरणे, सीमा भिंती पडणे असे प्रकार घडत आहेत. या सर्व गोष्टींमुळे पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या सर्व प्रकाराला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.
सुतार यांनी या संदर्भात महापालिका आयक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यात होणारे हे प्रकार टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे सुचवले आहे.
पावसाळी लाईन चे योग्य नियोजन करा
पुणे शहराच्या सर्वच भागात जवळ जवळ ८० टक्के हून जास्त प्रमाणात सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते तयार असून त्याकडेने ब्लॉक पट्ट्या, फूटपाथ विकसित झाले आहेत. हे करताना ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी नियोजन केले आहे ते नियोजन शून्य आहे. तर काही ठिकाणी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाचे पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी नियोजन नाही त्या ठिकाणी नवीन पावसाचे लाईन विकसित करून काही चेंबर्स मध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था करावी. यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने जमिनीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होईल.
दिखाव्याची साफसफाईची कामे नको
चेंबर ते चेंबर सफाई करा
ज्या ठिकाणी पावसाळी लाईन टाकलेली आहे त्या ठिकाणी साफसफाईचे टेंडर काढून कामे केल्याचे दाखवले जाते. परंतु ही कामे व्यवस्थित व पूर्ण सक्षमपणे होत नाहीत. चेंबर ते चेंबर लाईन साफ करणे आवश्यक असताना फक्त चेंबर व त्यावरील झाकण साफ केले जाते. लाईन तशीच गाळाने भरलेली राहते. यामुळे पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून जात नाही त्यामुळे ते रस्त्यावरील आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये सोसायट्यांमध्ये शिरते. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्यात वाहनांसहित माणसेही वाहून गेल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. यामुळे चेंबर सहित लाईन ची व्यवस्थित सफाई केली जाणे आवश्यक आहे.
नाल्यावरील अतिक्रमणे काढून नाले रुंद करा
नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी आजूबाजूच्या परिसरात घुसण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नाल्यावरील अतिक्रमणे काढून चुकीच्या दिलेल्या परवानग्या रद्द करून नाले रुंद केले गेले पाहिजेत. आंबील ओढ्याचा प्रश्न आजही प्रतीक्षेत आहे. तेथील बधितांचे योग्य ते पुनर्वसन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
आपत्ती व्यवस्थापन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा
पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अस्तित्व काय याचा आम्हाला प्रश्न पडला आहे. या विभागाचे नक्की काय काम आहे कोणालाच माहित नाही. या विभागाची व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे. त्यामुळे या घडणाऱ्या घटनांना हा विभाग देखील जबाबदार आहे. हा विभाग आवश्यक त्या साधन सामुग्रीसह पूर्ण क्षमतेने चालवला गेला पाहिजे. वेळ नघुन गेल्यावर हा विभाग जागा होत असतो. त्यामुळे हा विभाग सक्षम होणे आवश्यक आहे.
मेट्रो कामामुळे पौड रस्त्यावर पाणी साठते ; नियोजन आवश्यक
कोथरुड भागातून पुणे मेट्रोचा कोथरूड रामवाडी मार्ग जातो. मेट्रोच्या चुकीच्या नियोजनामुळे संपूर्ण पौड रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
वडगाव शेरी साईनाथनगर येथील रहिवाशांचा त्रास सोडवावा
वडगाव शेरी साईनाथनगर येथील रहिवाशांना प्रत्येक पावसाळ्यात तीन ते चार वर्षापासून पावसाच्या पाण्याचा व ड्रेनेज लाईनच्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागतो. सांडपाणी तीन फुटापर्यंत घरांमध्ये साठते. स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या बिल्डर धार्जीन निर्णयामुळे 300 ते 400 घरे बाधित होत आहेत. हीच परिस्थिती पुणे शहराच्या बऱ्याच भागांमध्ये आहे तरी हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
या सुचवलेल्या उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करून पुणेकरांवर येत असलेल्या पावसाळी पाण्याच्या संकटाचे निवारण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सुतार यांनी केली आहे.




