
महापालिकेच्या निवडणुकीत स्पर्धा असते, चुरस असते, तसेच काही हलके-फुलके क्षण असतात, काही गमतीदार प्रसंगही घडतात.
पुणे महापालिकेत पहिल्यांदाच विजयी झालेल्या उमेदवाराचा जल्लोष काही वेगळाच असतो. त्याला अपार आनंद झालेला असतो. तगड्या उमेदवाराविरुद्ध लढून दुसऱ्यांदा जो निवडून येतो, त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं. आपण पाच वर्षे काम केले, त्याला मतदारांनी पसंतीची पावती दिली याचे ते समाधान असते आणि तिसऱ्यांदा, चौथ्यांदा निवडून आलेल्यांसाठी ते रुटीन झालेलं असते. तिसऱ्यांदा निवडून आलेल्या एका उमेदवाराच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्याच्यासह संपूर्ण कुटु़बाचे चहापान शांतपणे चालू होते. त्याच्यासाठी निवडणुकीतला विजय रुटीन होता.
२०१२च्या निवडणुकीत उपनगरातले एक नगरसेवक दुसऱ्यांदा निवडून आले. आपण निवडून येणार याची कल्पना त्या उमेदवाराला मतमोजणीच्या दिवशी दुपारी साधारणतः बारा ते एकच्या दरम्यान आली होती. एकच्या सुमारास ते आपल्या कार्यालयातून अचानक गायब झाले. अभिनंदनासाठी नागरिक येत होते आणि उमेदवार कुठे गेले? याची चौकशी करत होते. त्या उमेदवाराच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांना आपले साहेब आत्ता कुठे आहेत याचा अंदाज आला होता. पण, चौकशी करणाऱ्या नागरिकांना ते ‘साहेब येतीलच, थांबा’ म्हणून थांबवून धरत होते. दोन, अडीचच्या सुमारास ते उमेदवार परत आले. त्यांचा रागरंग पाहून स्वारी भलतीच खुशीत आहे, हे लोकांच्याही लक्षात आले. या खुशीतच ‘ते’ भेटणाऱ्या प्रत्येक पुरुष नागरिकाला मिठ्या मारत होते. महिला कार्यकर्त्या आल्या की, मोठ्या आवाजात ‘या ताई या’, असे म्हणत, महिलांना हात उंचावून नमस्कार करत होते. मामला भलताच खुशीचा चालला होता.
तेवढ्यात एक ज्येष्ठ नागरिक अभिनंदन करण्यासाठी तिथे आले. त्यांना पाहून विजयी उमेदवार धावतच त्यांच्यापाशी गेले आणि सर, असे म्हणत नमस्कारासाठी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. एक मिनिट झालं, दोन मिनिटे झाली. तरी, महाशय सरांचे पाय काही सोडेनात. काय करावे ते सरांनाही उमगेना. जमलेल्या सगळ्यांचीच स्थिती अवघडल्यासारखी झाली. उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काय झालं ते ओळखलं आणि त्या उमेदवार महाशयांच्या खांद्याला धरून त्यांना उभं केलं आणि बाजूला ऑफिसमध्ये नेऊन एका खुर्चीवर बसवले.
दुसऱ्यांदा विजयी झाल्याचा आनंद जरा जास्तच झालाय आणि साहेबांना जरा ‘जास्ती’च झाली आहे याचा अंदाज कार्यकर्त्यांबरोबरच उपस्थितांनाही आला. पुढे दहा, बारा दिवस विजयी उमेदवाराच्या मतदारसंघात हीच चर्चा चवीने चालली होती.
राजेंद्र पंढरपुरे.
सिंहासन NEWS– तो आला त्याने पाहिले आणि एबी फॉर्मच चोरून नेला https://www.sinhasannews.com/he-came-and-saw-it-and-stole-the-ab-form-8809/
सिंहासन NEWS– पुण्यात एका उमेदवाराने प्रचारासाठी आणला होता खराखुरा सिंह.. https://www.sinhasannews.com/in-pune-a-candidate-had-brought-a-real-lion-for-campaigning-8569/
सिंहासन NEWS– महापालिकेची पोटनिवडणूक गिरीश बापटांना लाभली. https://www.sinhasannews.com/municipal-corporation-by-election-was-won-by-girish-bapat-8903/







