हीच कोथरूड मधील बहिणींना भाऊबीजीची खरी भेट ठरेल..गिरीश गुरनानी यांचे कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन..

कोथरूड : कोथरूड मधील वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून कोथरूड मधील माता भगिनींना सुरक्षित असे वातावरण निर्माण करून द्या तसेच कोथरूडला गत वैभव पुन्हा प्राप्त करून द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल माने यांना निवेदन देत केली.

गिरीश गुरनानी म्हणाले, या भाऊबीजेला मी कोथरूड मधील सर्व बहिणींना एकच भेट देऊ इच्छितो ती म्हणजे कोथरूड मधील गुन्हेगारी कमी व्हावी व आपणास राहण्यास सुरक्षित असे वातावरण असलेला परिसर ही कोथरूड ची ओळख पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी मी अखेरपर्यंत प्रयत्न करत राहील.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाची पंढरी तसेच राज्याच्या व देशाच्या आर्थिक यंत्रणेचा एक प्रमुख भाग आहे. येथे अनेक युवा तसेच अबालवृद्ध अवघ्या महाराष्ट्रातून येतात व आपापल्या परीने कष्ट करून जीवन जगण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी धडपडत असतात. या सुसंस्कृत पुण्याचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू म्हणजे येथील कोथरूड हा परिसर.
कोथरूड हा परिसर पुण्याच्या सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावतो. येथे अनेक मध्यमवर्गीय साधी भोळी लोक आपल्या मेहनतीने आपले आयुष्य उभे करतात आणि या कोथरूडला स्वतःची जन्मभूमी कर्मभूमी आणि पुण्यभूमी मानतात.
अश्यातच मागच्या काही वर्षात या आपल्या सुंदर सुसंकृत कोथरूड मध्ये गुंडगिरी, गँगवॉर, हफ्ते वसुली, दुकानफोडी, घरफोडी, साखळीचोरी, महिलांवर अत्याचार, कोयता गँग प्रकरण अशा अनेक गुन्हेगारी कृत्यांचा जणू सुळसुळाटच अनुभवायला मिळत आहे. या कृत्यांमुळे सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण होत चालली आहे. आणि हेच या समाजातील अराजक तत्त्वांचे लक्ष्य आहे.



या जाचातून जर कोथरूडला कोणी मुक्त करू शकते तर ते आहे आपले कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्र आणि पुणे पोलिस. या कोथरूडचे रक्षण करण्याची जबाबदारी कोथरूडचे पोलिस निरीक्षक या नात्याने परमेश्वराने आपल्या खांद्यावर टाकली आहे. आणि याच कारणाने येथील जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे असे गिरीश गुरनानी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
या कोथरूडच्या असंख्य सामान्य जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो की कठोरातली कठोर कारवाई करून आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हेगारांचे संबंध कुठल्याही राजकीय पक्षाशी, प्रतिष्ठित व्यक्तींशी किंवा धनाढ्य इसमांशी असले तरीही त्याची कुठलीही गयावया न करता, कोथरूडला या त्रासातून एकदाचे मुक्त करा व कोथरूडला गत वैभव, समृद्धी व शांतता प्राप्त करून द्या.असे केल्यास येथील जनता व मी आपले सदैव ऋणी राहू असे गिरीश गुरनानी यांनी म्हटलं आहे.



