कोथरूड मधील कचरा वाहक – वेचक यांची दिवाळी झाली गोड ; संघटनेच्या वतीने सरंजाम वाटप

विजय डाकले यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कोथरूड : कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेले आणि पुणेकरांचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून प्रयत्नशील राहणारे कचरा वेचक आणि कचरा वाहक यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक अनोखा उपक्रम कोथरूड मध्ये पार पडला. कचरा वेचक- वाहक संघटनेच्या वतीने कोथरूड भागातील संघटनेच्या कचरा वेचक, वाहक सभासदांना या उपक्रमाअंतर्गत दिवाळी सरंजाम वाटण्यात आला.
कचरा वेचक आणि वाहक संघटनेचे प्रमुख विजय डाकले यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल गेहलोत यांच्या हस्ते सेवकांना दिवाळी सरंजाम किट देण्यात आले. यावेळी, विनोद मोहिते, उमेश भेलके, अजय भुवड, जयदीप पडवळ, संदीप मोकाटे, अनिरुद्ध खांडेकर, बाळासाहेब खंकाळ तसेच कचरा वेचक वाहक संघटनेचे अध्यक्ष नामदेव पुलावळे, उपाध्यक्ष महादेव भिसे अमोल जाधव, हंसराज गायकवाड तसेच सभासद उपस्थित होते.
यावेळी गरीब कष्टकरी कचरा वाहक आणि वेचकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या हेतुने सणासुदीला लागणारे साखर, तेल, डालडा, बेसन पीठ, रवा, भाजके पोहे, सुगंधी ऊटने, बदामाचे तेल, पणत्या हे साहित्य या वेळी वाटप झाले. यासोबतच यावेळी दिवाळी फराळ करण्यात आला.
रमेश बागवे म्हणाले, कचरा वेचक वाहक यांच्यामुळे पुणे शहराचे आरोग्य निरोगी राहते पण कष्टकरी वर्गाचे आरोग्य चांगले राहावे त्यांच्या अडचणी सोडविल्या जाव्यात यासाठी प्रशासन काहीच करत नसल्याचे दिसत आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देखील दिल्या जात नाहीत. आज या कष्टकरी वर्गाने आपले काम बंद केले तर शहराची काय अवस्था होऊ शकते याचा प्रशासनाने विचार करावा. आज कष्टकरी वर्गाची दिवाळी गोड व्हावी यासाठी घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.
कचरा वेचक – वाहक आहेत म्हणून हे शहर सुंदर आहे. ते रोज घेत असलेल्या कष्टामुळे पुणेकरांचे आरोग्य निरोगी राहत आहे. त्यामुळे या कष्टकरी वर्गाची दिवाळी गोड व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे विजय डाकले यांनी सांगितले.







