पतंजली दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर; दिल्लीतील वकील, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, धाडली नोटीस

नवी दिल्ली : आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. कंपनीच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदाराचं म्हणणं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
कोलगेट “आमच्या टूथ पेस्टमध्ये नमक आहे”, असं स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र, “आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे” असे सांगून, लोकांना “फिश बोन” (माशांची हाडे) युक्त मासांहारी टूथपेस्ट विकत आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
“हा बाबा रामदेव वर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा विश्वासघात आहे. त्यांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, शाकाहारी लोकांना मासांहरी उत्पादने विकली आहेत. पतंजली उत्पादने प्रमोट करणाऱ्या लोकांनी देखील 10 वेळा विचार करावा की, आपण आपले खिसे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून तर भरत नाही आहोत ना याचा”, असंही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटलं आहे.

दिल्लीत वकील म्हणून कार्यरत असलेल्या वकील शाशा जैन पतंजलीला नोटीस धाडली आहे. शाशा जैन यांनी आपल्या नोटीससह सगळे दस्तावेजही जोडले आहेत. या दस्तावेजात त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं आहे की दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे असं म्हटलं गेलं आहे. त्यावर हिरव्या रंगाचे लेबलही लावले आहे. मात्र दिव्य दंत मंजन यामध्ये Samudra Fen वापरण्यात आलं आहे. ग्राहकांसह केलेला हा धोका आहे. ग्राहकांची ही शुद्ध फसवणूक आहे. लेबलिंग नियमांचं पतंजलीने उल्लंघन केलं आहे असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
शाशा जैन यांनी असंही म्हटलं आहे की माझ्या कुटुंबातले काही सदस्य, काही परिचयाचे लोक दिव्य दंतमंजन वापरतात. मात्र या दंत मंजनात Cuttlefish सारखे मांसाहारी घट वापरले आहेत. हे समजल्यानंतर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पतंजलीकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उत्पादनांवर विश्वास कसा ठेवायचा असंही त्यांनी विचारलं आहे.


