WASPS संस्थेच्या प्राणीरक्षकांनी केली चिंकारा हरणाची सुटका.

पुणे: सकाळी ७.३० च्या दरम्यान मयूर पाटील नामक व्यक्तीने वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसूळ यांना फोन करून येवलेवाडी येथील ज्युबिलीयंट सोसायटीमध्ये एक हरीण आले असून भटक्या कुत्र्यांनी त्याला मागे लागून जखमी केले असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद अडसूळ आणि राज साळवी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चिंकारा हरणाची सुटका केली.
अडसूळ म्हणाले, प्रत्यक्ष घटनस्थळी जाऊन पाहिल्यावर हरीण हे चिंकारा (Gazella bennettii) जातीची मादी असल्याचे समजले, ते दुर्मिळ गटात मोडत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्वरित टेहळणी करून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. दुसऱ्याच प्रयत्नामध्ये त्या चिंकाऱ्यास रेस्क्यू जाळीमध्ये ट्रॅप करण्यास वाईल्ड एनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या प्राणीरक्षकांना यश मिळाले.
प्रथमदृष्ट्या चिंकाराला तपासले असता त्याला किरकोळ जखमा व एक शिंग तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चिंकारा हरणास काळजीपूर्वक रित्या कात्रज येथील वन्यप्राणी अनाथलयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. त्याचवेळी सदर घटनेची खबर त्वरित वनाधिकारी इंगळे यांना फोनवरुन सांगण्यात आली. प्रथमोपचारा दरम्यान चिंकारा निसर्गात मुक्त करण्यास सक्षम असल्यामुळे त्यावर प्रथमोपचार करुन त्यास लगेच मुक्त करण्याचा निर्णय WASPS चे प्राणीरक्षक व अनाथलयाचे डॉक्टर व महेश देशपांडे सर यांनी घेतला. वनाधिकारी इतर कारवाईत व्यस्त असल्यामुळे WASPS च्या पदाधिकाऱ्यांनी चिंकारा निसर्गात मुक्त केलेल्या जागेपासून त्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी नेऊन मुक्त केले. सर्व पुरावे हे फोटो व विडियोद्वारे वनाधिकारी इंगळे यांच्यापर्यंत पोचवले गेले आहेत.
या संपूर्ण कारवाईत WASPS चे अध्यक्ष आनंद अडसूळ, सचिव राज साळवी , मयूर पाटील , प्रशांत परतवारी आणि महेश देशपांडे सहभागी होते.










