महापालिका निवडणुक प्रभाग पद्धतीबाबत राज्यपाल काय निर्णय घेणार? अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांच्या कोर्टात..

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई
वगळून इतर महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग
पद्धतीचा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तीनच्या प्रभागाचा घेतलेला निर्णय आता कायम असणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे दोनचा प्रभाग करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याचे बोलले जात आहे.What decision will the Governor take regarding Municipal Election Ward system?
राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अध्यादेश काढून प्रभाग पद्धतीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे प्रभाग पद्धतीवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
राज्यपाल कोश्यारी या अध्यादेशावर काय भूमिका घेणार ते यावर स्वाक्षरी करणार का, हे आता पहावे लागणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीवर वादळी चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 सदस्यीय प्रभाग करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती कायम ठेवली होती.

काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रभाग रचनेत बदल होण्याचे
संकेत दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुध्दा दोन सदस्य प्रभाग रचनेसाठी आग्रही होते. महापालिकेत 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते असे सांगितले जात होते. बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा होऊ शकते. आमच्या कार्यकारिणी बैठकीत दोन सदस्यीय प्रभाग असावा अशी चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी परत चर्चा होऊ शकते, असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. मात्र आज तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अध्यादेश राज्य सरकार कडून काढण्यात आल्याने दोन सदस्य प्रभाग रचनेचा विषय मागे पडला आहे.



