राष्ट्रीय

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

कोण आहेत नायक यशवंत घाडगे, काय आहे त्यांच्या शौर्याचा इतिहास

नवी दिल्ली : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या इटलीतील राजदूत वाणी राव आणि मॉन्टोनचे महापौर मिर्को रिनाल्डी यांनी संयुक्तपणे या स्मारकाचे उद्घाटन केले.

Img 20250508 wa0001235733770892078245

या भावनिक समारंभात भारत आणि इटलीच्या राष्ट्रगीतांचे सादरीकरण इटालियन लष्करी बँडने केले. पेरुजिया प्रांताचे अध्यक्ष मासिमिलियानो प्रेसियुटी, वरिष्ठ लष्करी आणि पोलिस अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16 नोव्हेंबर 1921 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पळसगाव – आंब्रेची वाडी येथे जन्मलेले यशवंत घाडगे 3/5 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये नायक म्हणून कार्यरत होते. 10 जुलै 1944 रोजी अप्पर टायबर खोऱ्यातील लढाईत, शत्रूच्या मशीनगन हल्ल्यात सहकारी सैनिक ठार, जखमी झाल्यानंतर, घाडगे यांनी एकट्याने शत्रूच्या मशीनगन पोस्टवर धाडसी हल्ला चढवला. ग्रेनेड आणि बंदुकीच्या बॅरलचा वापर करून त्यांनी शत्रू सैनिकांना नेस्तनाबूत केले, परंतु स्नायपरच्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘विक्टोरिया क्रॉस’ हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळाला. मॉन्टोन शहराने त्यांना “पर्सोनॅजियो इलस्ट्रे डी मॉन्टोन” हा विशेष मान देऊन गौरविले.

Img 20250711 wa01938153452573979352517

2023 मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मॉन्टोन येथील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली होती. इटालियन शिल्पकार इमॅन्युएल व्हेंटानी यांनी डिझाइन केलेला हा कांस्य पुतळा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने उभारण्यात आला. या समारंभाने नायक घाडगे यांच्या बलिदानाची आठवण ताजी करत भारत-इटलीमधील मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी दिली. मॉन्टोनच्या नागरिकांच्या हृदयात, 80 वर्षांनंतरही, नायक यशवंत घाडगे यांचे स्थान कायम आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 144

Screenshot 20250710 110010 whatsapp2954762159264963718
Img 20250704 wa03105141954843688917612
Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये