मुंबईत आज होणाऱ्या समर्थकांच्या बैठकीत पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार ?
मुंबई : भाजपा खासदार प्रीतम मुंडे (MP
Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसल्यामुळे बीडमधील मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरू आहे. पंकजा मुंडे व प्रीतम मुंडेही नाराज असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे. दिल्लीवरून पक्ष श्रेष्ठींची भेट घेऊन आल्यानंतर आज मुंबईत त्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. Will Pankaja Munde take a big decision in today’s meeting of supporters?
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील तब्बल दीडशे भाजपा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले असून हे सत्र सुरूच आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे या बैठकीत नाराज कार्यकर्त्यांची समजूत पंकजा मुंडे कशी काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या बैठकीत कोणता मोठा निर्णय घेतला जाणार का याबाबत तर्क लढवले जात आहेत.

या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून निवडक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. बैठकीत या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



