पुणे शहर

‘मुळशी’ नावाच्या नकारात्मक वापराला आळा घाला; चित्रीकरणासाठी समितीची परवानगी बंधनकारक करा

मुळशी बचाव समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे : ‘मुळशी पॅटर्न’ किंवा ‘मुळशी’ या शब्दाचा गुन्हेगारी, दहशत, बेकायदेशीर कृत्ये अथवा नकारात्मक घटनांशी संबंध जोडत व्यावसायिक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये होत असलेल्या वापराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘मुळशी बचाव समन्वय समिती’च्या (अराजकीय) वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

मुळशी तालुक्याला संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, स्वातंत्र्य चळवळ, सत्याग्रह, शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या भूमीने महाराष्ट्राला अनेक कर्तृत्ववान व्यक्ती दिल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळात ‘मुळशी’ हे नाव गुन्हेगारी आणि नकारात्मक घटनांच्या संदर्भात चित्रपटांच्या माध्यमातून वापरले जात असल्याने मुळशी तालुक्याची आणि मुळशीकरांची सामाजिक प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289



चित्रपट किंवा वेब सिरीजमधून सातत्याने मुळशीचा संबंध गुन्हेगारीशी जोडला गेल्यास त्याचा परिणाम तालुक्यातील युवक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच कुटुंबांच्या सामाजिक संबंधांवर होऊ शकतो. त्यामुळे मुळशीची खरी ओळख, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक अस्मिता जपण्यासाठी लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही चित्रपट, वेब सिरीज किंवा व्यावसायिक कलाकृतीमध्ये ‘मुळशी’ या नावाचा नकारात्मक अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी दर्शविण्यासाठी वापर करण्यास विरोध दर्शविला आहे. अशा प्रकारच्या नावांना प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, मुळशी तालुक्याच्या हद्दीत चित्रपट, मालिका किंवा कोणत्याही व्यावसायिक चित्रीकरणापूर्वी ‘मुळशी बचाव समन्वय समिती’ची पूर्वपरवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे बंधनकारक करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चित्रीकरणामुळे तालुक्याच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे पुणे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच संबंधित विभाग आणि चित्रपट निर्मिती संस्थांना आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी विनंती समितीने केली आहे.

‘मुळशीची ओळख गुन्हेगारीमुळे नव्हे, तर तिच्या समृद्ध इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्वामुळे व्हावी,’ या भूमिकेतून मुळशी बचाव समन्वय समितीने हा लढा उभारला असून, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये