कोथरूडमध्ये महिलांच्या दहीहंडीत मराठी भाषेचा डंका..फलक हातात घेऊन महिला सहभागी

किशोर शिंदे आयोजित महिला दहीहंडी चेंबूरच्या गोपीका पथकाने फोडली
कोथरूड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोथरूड मधील जीत मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महिला दहीहंडीत मराठी भाषेवरील प्रेमा संदर्भातील फलक घेऊन महिला वर्ग सहभागी झाला होता. महाराष्ट्रात फक्त मराठीच, म मराठीचा, आवाज मराठीचा, स्त्रियांना द्या इतका मान की वाढे आपल्या देशाची शान, जागर स्त्री शक्तीचा..आदर स्त्री शक्तीचा, असे फलक महिलांनी हातात घेतले होते.

कोथरूड मधील महिलांनी या महिला दहीहंडीत उत्स्फूर्त सहभागी होत मनसोक्त आनंद घेतला. महिला सुरक्षारक्षक व मन सैनिकांच्या सुरक्षा कवच असलेल्या या महिला दहीहंडीत महिलांनी रिमिक्स गाण्यावर ठेका धरत धमाल केली.
मनसे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी नगरसेवक किशोर शिंदे आयोजित आदर स्त्री शक्तीचा, जागर स्त्री शक्तीचा असे घोषवाक्य असणारी ही महिला दहीहंडी मुंबईतील चेंबूर येथील अमर ज्योत सेवा मंडळाच्या गोपीका पथकाने फोडली आणि उपस्थित हजारो महिलांनी जल्लोष केला. अतिशय सुरक्षित वातावरणात ही दहीहंडी होत असल्याने मोठ्या संख्येने कोथरूड मधील महिला या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. अशा सुरक्षित वातावरणात दहीहंडी चा आनंद घेता येत असल्याने कोथरूड मधील महिला दरवर्षी किशोर शिंदे यांचे मनापासून आभार मानत असतात. किशोर दादा मुळेच आम्ही हा आनंद घेऊ शकतो अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत असतात.



किशोर शिंदे म्हणाले, महिला भगिनी या एकतर गृहिणी अथवा नोकरी व्यवसाय ही दोनही क्षेत्र सांभाळत असतात. आजच्या स्त्रीया पहिल्या सारख्या आबला राहिलेल्या नाहीत तर आजकाल स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तृत्व जगभर पसरवले आहे. तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने महिलांना पाहिजे तेवढा योग्य तो सन्मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महिलांचे सशक्तीकरण’ करणे क्रमप्राप्त झाले आहे.
आपण आजवर पहात आलो की दहीहंडी उत्सव हा केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेला उत्सव समजला जात होता परंतु हीच व्यवस्था मोडीत काढण्याच्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरुड मधील पौड रस्त्यावरील जीत मैदान येथे अवघ्या महाराष्ट्रात सर्वप्रथम महिला दहीहंडी महोत्सवाच्या आयोजनास सुरुवात केली. या महिला दहीहंडी महोत्सवामध्ये फक्त आणि फक्त महिला भगिनींनाच मैदानावर प्रवेश दिला जातो आणि महिलांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये सुमारे २५००० महिला भगिनी या दहीहंडी महोत्सवाचा मनमुराद आनंद घेतात असे शिंदे यांनी सांगितले.
या दहीहंडीचे संयोजन संजय काळे, गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे, धनंजय बलकवडे, शशांक अमराळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी केले होते. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संगम तरुण मंडळ व सचिन फ्रेंड्स सर्कल कुंदन ग्रुप च्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.






