‘देऊळ बंद २’ चित्रपटातून कोथरूड मधील महिलांनी अनुभवला श्रद्धा, विचार आणि भावनांचा अनोखा प्रवास..

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने प्रभाग १० भुसारी कॉलनी , बावधनमधील महिलांसाठी मोफत शोचे आयोजन
पुणे : श्रद्धा, विचार आणि भावनांचा विलक्षण प्रवास घडवणाऱ्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाचा अनुभव कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १०, बावधन आणि भुसारी कॉलनी परिसरातील महिला भगिनींना घेता आला. नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पुढाकारातून महिलांसाठी या चित्रपटाच्या मोफत विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सध्या राज्यभरात ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची जोरदार चर्चा असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. श्रद्धा, सामाजिक वास्तव आणि विचारप्रवर्तक मांडणी यांचा संगम असलेल्या या चित्रपटाचा अनुभव आपल्या प्रभागातील महिलांनाही मिळावा, तसेच त्यांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात काही आनंदाचे आणि चिंतनाचे क्षण निर्माण व्हावेत, या उद्देशाने किरण दगडे पाटील यांच्या वतीने कोथरूड येथील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तीन मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत.
या तीन शोपैकी दोन शो अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडले. या विशेष प्रदर्शनावेळी महिलांशी संवाद साधण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्यासह चित्रपटाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, चित्रपटाचा संदेश आणि समाजातील श्रद्धा व मूल्यांचे महत्त्व याबाबत महिलांशी संवाद साधला.
चित्रपट संपल्यानंतर अनेक महिला भावूक झालेल्या दिसून आल्या. काहींच्या डोळ्यांत अश्रू होते, तर अनेकांनी चित्रपटाने मनाला स्पर्श केल्याची भावना व्यक्त केली. चित्रपटातील कथानक, स्वामीभक्तीचा संदेश आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे प्रसंग यामुळे महिलांवर विशेष प्रभाव पडल्याचे यावेळी जाणवले.
याबाबत बोलताना किरण दगडे पाटील म्हणाले, “समाजाला विचार करायला लावणारा, श्रद्धेला अधिक दृढ करणारा आणि मनाला स्पर्श करणारा असा हा चित्रपट आहे. आपल्या प्रभागातील महिला भगिनींना हा अनुभव देता आला, याचे समाधान वाटते. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून या उपक्रमाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.”
‘देऊळ बंद २’च्या माध्यमातून आम्हाला केवळ मनोरंजनच नव्हे, तर श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक जाणीवांचा संदेश मिळाल्याची भावना चित्रपटाला उपस्थित काही महिलांनी व्यक्त केली.






