शंकर केमसे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २२५ जणांनी केले रक्तदान

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २२५ जणांनी रक्तदान केले. या शिबिरात रक्तदात्यांना प्रोटीन युक्त आहार मिळवा म्हणून मांसाहारी असेल तर एक किलो चिकन व शाकाहारी असेल तर अर्धा किलो पनीर भेट देण्यात आले.
सध्या रक्तदान केल्यास रक्तदात्यास निरनिराळ्या भेटवस्तू दिल्या जातात. या शिबिरात मात्र रक्तदात्यास चिकन व पनीर भेट देण्यात आल्याने या शिबिराची चर्चा सर्वत्र होती. कोथरुड डेपो येथील शंकर केमसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
डॉ. संतोष वाघ, डॉ. सुर्यवंशी परशुराम, डॉ. अमित देशमुख, डॉ. सुनील अंभोरे, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. विशाल जाधव, अमर सुतार, सी. एस. पाटील, अरुण कदम, अरुण भिकुले, राजेंद्र नायडू, भाऊसाहेब एकाड, संजय पवार, निलेश निवासी यांनी या शिबिराचे संयोजन केले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शंकर केमसे यांनी सांगितले. blood donation







