पुण्यातील युवा सेनेचा शहरप्रमुख नेत्याच्या भावकीतील, नात्यातील नको ; सक्षम कार्यकर्त्यांना संधी द्या शिवसैनिकांची अपेक्षा

चर्चेमुळे युवा सेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर
पुणे : सध्या पुणे शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे, परंतु या निवडी करत असताना शहरात मुख्य पदाधिकारी असणाऱ्यांच्या घरातच युवा सेनेचे शहर प्रमुख पद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुर असल्याचे दिसून येत आहे.
युवा सेनेचा शहर प्रमुखाची निवड होण्याआधीच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याने नेत्यांना निवडी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवा सेनेचे बाहेरचे काही विस्तारक पुण्यातील निवडीत हस्तक्षेप करत असल्याची चर्चा ही जोरात सुरू आहे.

नुकतीच शिवसेना बाळासाहेबांची म्हणजे शिंदे गटाने पुण्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून आघाडी घेतली आहे. या निवडीत युवा सेनेच्या शहर प्रमुख पदी व इतर पदांवर तगड्या कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. त्यांना तोडीसतोड असा युवा सेना शहरप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कराव्या लागणार आहेत. परंतु घरातल्या तसेच भावकितल्या लोकांना युवा सेनेचे प्रमुख पद देण्याबाबतची चर्चा असल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असे झाले तर युवा सेनेचे पदाधिकारी फुटण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.



जशी चर्चा आहे तशाच निवडी झाल्या तर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. आधीच फुटीचे ग्रहण लागले असल्याने निवडी करताना सारासार विचार करून भावकितल्या, जवळच्या नात्यातल्या नाही तर क्षमता असलेल्या युवा कार्यकर्त्यांचीच पुणे शहराच्या युवा सेनेच्या प्रमुख पदाबरोबर इतर पदांवर निवड केली जावी अशी अपेक्षा उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेतील कार्यकर्त्यांची आहे.






















































