धुलीवंदनातील “चैतन्य” हरपले, अवघ्या बारा वर्षाच्या मुलाचा अचानक मृत्यू

पुणे : धुलीवंदनाचा सगळेजण आनंद घेत असताना अचानक एक लहान मुलगा खाली कोसळला. अवघ्या काही क्षणात काही समजण्यापूर्वीच त्याने प्राण सोडले. विश्रांतवाडी येथील जगराम कॉम्प्लेक्स सोसायटीत ही घटना घडली. चैतन्य प्रकाश शिंदे (वय 12) या चिमुकल्याचा सकाळी धुलीवंदन खेळत असताना अचानक मृत्यू झाल्याने या सोसायटीवर शोककळा पसरली.
चैतन्य नेहमीप्रमाणे सोसायटीतील मित्रांबरोबर होळी खेळत होता. अचानक त्याला दम लागला. आणि तो खाली कोसळला. तातडीने प्रथमोपचारासाठी त्याला सोसायटीतच राहणारे डॉ.संजय दाभाडे यांच्या घरी सर्वजण घेऊन गेले. तातडीचे उपचार देऊन देखील त्याला त्याने कोणताच प्रतिसाद न दिल्यामुळे जवळच्या खाजगी रुग्णालयात त्याला नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या सर्व घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह सोसायटीतील नागरिकांना मोठा धक्का बसला. चैतन्य हा आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह या सोसायटीत वास्तव्यास होता. अत्यंत खेळकर आणि खोडकर अशा स्वभावाचा चैतन्य अचानक गेल्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. चैतन्यला हृदया संदर्भातील काही उपचार सुरू होते. खेळताना त्याने अचानक जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे आरोग्याबाबत सगळ्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचेच समोर आले आहे.




