पुणे शहरात “गाडी वाला आया कचरा निकाल” आणि कर्वेनगरमध्ये “होऊ दे परिस्थिती बकाल” हीच काय प्रशासनाची भूमिका ?

काय करतोय क्षेत्रीय कार्यालयाचा आरोग्य विभाग
कर्वेनगर : pune karvenagar कर्वेनगर परिसर सध्या एका मोठ्या समस्येला तोंड देत आहे. कर्वेनगर मध्ये रस्त्यावर व रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे ढीग लागत असल्याने कर्वेनगरमध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोज सकाळी जेव्हा लोक व्यायामासाठी किंवा सकाळच्या शुद्ध हवेसाठी आपल्या घरांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांना सर्वप्रथम रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरभर स्वच्छ भारत अभियान महापालिकेकडून राबवण्यात येत असले तर या अभियानाचा प्रभाव कर्वेनगर मध्ये कधीच दिसून आला नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातील अधिकारी हे कचरा पडत असलेले स्पॉट बंद करण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांना रस्त्यांवरचे हे बकाल चित्र पहावे लागत आहे. जेथे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेजवळील आरोग्य कोठीचं रोज कचऱ्याच्या विळख्यात असेल तिथे इतर भागांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा असे नागरिक सांगत आहेत. गोल्डन पेटल जवळ भालेकर उद्यान कॉर्नरला पडत असलेला कचरा पथावरून रस्त्यावर आलेला असतो त्यातून मार्ग काढताना पादाचारी व वाहन चालकांनाही कसरत करावी लागते.



कर्वेनगर मधील गोल्डन पेटल जवळ भालेकर उद्यान कॉर्नर, कर्वेनगर मुख्य चौक उड्डाण पुलाखाली, साई बाबा मंदिर ते वनदेवी कॉर्नर रस्ता, श्रमिक वसाहत कॅनॉल रस्त्यावर आरोग्य कोठीला लागून, कॅनॉल रस्त्यावर पार्थ बिल्डिंग समोर, गालिंदे पथ रस्त्यावर, नदी कडेच्या डीपी रस्त्याच्या कडेने, मावळे आळी, वारजे कॅनॉल रस्ता अशा ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागत आहेत. याबाबत प्रशासन काहीच करत नसल्याने नागरिकांच्या मनात चीड असून नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कर्वेनगरमधील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागत असताना मात्र वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे आधिकरी सुस्त कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. कर्वेनगर परिसर कचरापेटी मुक्त झाला असला तरी तो कधीच कचरा मुक्त झाला नाही हे रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे म्हणावे लागेल. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्वेनगरचे सर्वेक्षण झाले असेल तर पुणे शहराला नंबर मिळवण्यात फटका बसू शकतो. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.
विजय खळदकर (अध्यक्ष कोथरूड काँग्रेस)
रस्त्याच्या कडेने पडणाऱ्या कचऱ्यामुळे कर्वेनगरला बकाल स्वरूप प्राप्त झाले. नागरिकांना रोज सकाळी रस्त्याच्या कडेने पडलेला कचरा पहायला लागत असेल तर ही गांभीर बाब आहे. कर्वेनगरच्या मुख्य चौकात पडत असलेला कचराच कर्वेनगरचे बकाल चित्र बाहेरून येणाऱ्या नागरिकांसमोर उभे करत आहे. याबाबत प्रशासन नक्की काय करतय असा प्रश्न निर्माण होतोय. कचऱ्याचे स्पॉट बंद करण्यासाठी प्रशासनाने रस्त्यावर उतरून कारवाई करणे आवश्यक आहे.
विनोद मोहिते (भाजप सरचिटणीस ओबीसी आघाडी)
भालेकर उद्यानाच्या कॉर्नरवर सोसायटीच्या गेटजवळच कचरा पडत आहे. याबाबत आपण काही दिवसांपूर्वी महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांना पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे मागणी केली होती. मात्र प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उपाययोजना केली नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागेल.
चेतन भालेकर (सामाजिक कार्यकर्ते)
कर्वेनगर मधील रस्त्यावर कचरा पडणारे स्पॉट बंद करण्यासाठी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभिनव उपक्रम राबवले तसे उपक्रम वारजे कर्वेनगर चे कर्मचारी का राबवत नाही असा प्रश्न पडतो. कर्वेनगर परिसरात रस्त्यावर कचरा पडू नये म्हणून कोणतीच उपाययोजना केली जात नाही याबाबत नवल वाटत असून आरोग्य विभाग झोपा काढत आहे का? महापालिका सहाय्यक आयुक्त काय करत आहेत?
सचिन फोलाने (उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा)
रस्त्यावर पडणारा कचऱ्यामुळे आरोग्याचा गांभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. हा कचरा पडू नये यासाठी प्रशासनाने यंत्रणा लावणे आवश्यक आहे. कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाची जरब निर्माण होणे आवश्यक आहे.
प्रमोद शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
भालेकर उद्यानाच्या कॉर्नर ला पडत असलेल्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रात्री ९ नंतर हा कचरा पडायला सुरुवात होते. या नंतर प्रशासनाने थोडे दिवस पडत असलेल्या कचऱ्याचे स्पॉट ठरवून कारवाई केली तर फरक पडू शकतो. स्थानिक लोकांची ही त्यासाठी मदत घ्यावी. दंड स्वरूपात खिशाला झळ बसली तर बेजबाबदार नागरिक, विद्यार्थी जागेवर येतील.
प्रतीक नलावडे






