चंद्रकांत पाटील पुणेकर व कोथरूडकरांची दिशाभूल करत आहेत : चंद्रकांत मोकाटे

वेताळ टेकडी, पौड बालभारती रस्ता.. चंद्रकांत मोकाटे यांनी साधला निशाणा..
पुणे : महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बाणेर येथील सभेत बालभारती ते पौड फाटा रस्त्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन नागरिकांनाची दिशाभूल केली आहे. वास्तविक त्यांनी अशी चुकीची माहिती देऊ नये हा माझा त्यांना प्रामाणिकपणे सल्ला आहे असे महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी म्हंटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच बाणेर येथील एका सभेत बोलताना सांगितलं की बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामास आपण पालकमंत्री असताना स्थगिती दिली. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले की,चंद्रकांत पाटील हे जनतेची दिशाभूल करत आहेत. वास्तविक या रस्त्याच्या कामास चंद्रकांत पाटील मंत्री असलेल्या मंत्रिमंडळानेच मंजुरी दिली आहे तर चंद्रकांत पाटील या रस्त्याच्या कामास स्थगिती कशी देऊ शकतात असा सवाल मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे. मतांसाठी चुकीची माहिती देऊन पुणेकर आणि कोथरूडकर जनतेची चंद्रकांत पाटील यांच्याकडून घोर फसवणूक केली जात असल्याचा आरोप चंद्रकांत मोकाटे यांनी केला आहे.
मोकाटे म्हणाले की आम्ही पर्यावरणवादी आहोत तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचं उपस्थितीत आम्ही बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या पाहणी केली आणि या रस्त्याच्या कामाला विरोध केला होता. आम्ही कायम पर्यावरणवादी बरोबर आहोत. असे मोकाटे यांनी पाषाण परिसरात नागरिकांशी बातचीत करताना सांगितले.










