पुण्याला कनेक्टिव्हिटी शहर बनवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यातील सभेत मोदींना वाचला विकासाचा पाढा
पुणे : आयटी हब आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला येणाऱ्या काळात देशातील पहिले कनेक्टिव्हिटी शहर बनवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यातील स प महाविद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा पार पडली. या सभेत मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणांवर कडाडून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, खासदार मेधा कुलकर्णी, प्रकाश जावडेकर, नीलम गोऱ्हे व महायुतीचे पुणे शहर जिल्ह्यातील उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत औरंगजेबाचे कौतुक केले जाते अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी मोदी यांनी पुणे शहरातील विकास कामाबद्दल भूमिका मांडली. पुण्याला कनेक्टिव्हिटी शहर बनवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



मोदी म्हणाले, पुणे कायम भाजपचा विचारांचे समर्थन करणारे राहिले आहे. पुण्यातील जनतेचे मी आभार मानतो. येणारी पाच वर्षे हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारी असणार आहेत. पुण्यात गुंतवणुकी सोबतच पायाभूत सुविधा, औद्योगीकरण केले जाईल. त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीवर काम केले असून महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यात पुण्यात मोठे गुंतवणूक होत आहे असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
पुण्यात इलेक्ट्रॉनिक आणि आयटी क्षेत्रात गुंतवणूक झाली आहे. कंपन्यांची संख्या वाढली आहे. या स्टार्टअप चा पुण्यातील युवकांना फायदा झाला असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुण्यात मेट्रोचा विस्तार केला जात आहे त्यासोबतच रिंग रोडसाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत खोपोली खंडाळा मिसिंग लिंक साठी साडे सहा हजार तर बाह्य वर्तुळाकार रस्त्यांसाठी साडेदहा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. असे मोदी यांनी सांगितले.


