उत्तम संघटन कौशल्य असणाऱ्या दीपक मानकर यांच्या नावाची पुणे विधान परिषदेसाठी जोरदार चर्चा…

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, १६ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पुण्यातून पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नावाची विधान परिषदेसाठी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले काम, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि शहरातील कार्यकर्त्यांमधील संपर्क यामुळे मानकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वीच दीपक मानकर यांनीही विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मी देखील इच्छुक आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असेल. मात्र शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न, राबवलेले उपक्रम आणि कार्यकर्त्यांशी निर्माण केलेला संपर्क याचा पक्ष नक्कीच विचार करेल,” असे मानकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम संघटन कौशल्य असणाऱ्या दीपक मानकर यांच्यावर सोपवली होती. त्या कठीण काळात मानकर यांनी संघटन कौशल्य दाखवत पक्षाची मजबूत बांधणी केली. पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात जंबो कार्यकारिणी जाहीर करून त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शहरभर सातत्याने पक्षाचे कार्यक्रम, मेळावे आणि नियुक्त्या करत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्ष संघटना वाढीसाठी दीपक मानकर यांनी केलेले प्रयत्न. अजित दादांचा त्यांच्यावर असणारा विश्वास याचा विधान परिषदेची उमेदवारी देताना विचार होणार का हे आता पहावे लागणार आहे.

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शहरातीलच उमेदवाराला संधी द्यावी, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र दुसरीकडे पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील नेतेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने पक्षासमोर मोठे राजकीय गणित उभे राहिले आहे.
दीपक मानकर यांच्यासह नाना काटे, माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, रमेश थोरात यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर, पिंपरी-चिंचवड की पुणे ग्रामीणमधील कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



