पुण्यात पुणे पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश..पोलिसांकडून महत्वाचे आवाहन

पुणे : पुण्यात पुणे पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 नुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने 14 दिवस हा जमाबंदीचा आदेश लागू केला असून 26 मे 2026 ते 8 जून 2026 पर्यंत हा जमाबंदीचा आदेश लागू राहणार आहे. या काळात मोर्चे आणि सभा घेण्यास पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे.
शहरात विविध राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून होणारे धरणे आंदोलने, मोर्चे, निदर्शने, बंद तसेच अतिक्रमण कारवाई यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच बकरी ईद आणि इतर सण उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता राखली जावी यासाठी हा जमाबंदीचा आदेश काढण्यात आलेला आहे.

या काळात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे भाले, तलवारी, दंडकाठ्या, बंदुका अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवता येणार नाही, दगड, शस्त्रे, अस्त्रे, फेकायची हत्यारे जमा करणे किंवा तयार करणे यावर बंदी तसेच कोणत्याही व्यक्तीचे फोटो,प्रतिकात्मक प्रेत, नेत्यांचे चित्र दहन करणे, आक्षेपार्ह घोषणा देणे, सार्वजनिक टीका करणे, सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचेल अशी भाषणे, वस्तू प्रसारित करणे, याला बंदी घालण्यात आलेले आहे .
नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.



