पुणे शहरातील पाणीकपात तात्पुरती रद्द; पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे : पुणे शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये मागील कालावधीमध्ये (दि.१४/६/२०२६ अखेर) पाऊस न झाल्याने व धरणामधील पाणीसाठा कमी असल्याने संदर्भ क्र.१ च्या जाहिर निवेदनानुसार दि.१५/६/२०२६ पासून पुणे शहरामध्ये एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करून त्याअन्वये पाणी कपात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणामधील पाणी साठयामध्ये वाढ होत असून पुणे शहरामध्ये पालखी २०२६ चे औचित्य साधून बहुसंख्येने वारकरी समूदाय यांचे आगमन होत असल्याने तूर्तास दि.७/७/२०२६ पासून ते दि.१२/७/२०२६ पर्यंत संबंधीत पाणीकपात रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.
तसेच दि.१२/७/२०२६ अखेर धरण क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस व धरणामधील पाणीसाठा याबाबी विचारात घेऊन पाणीकपाती बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.तरी पाणीपुरवठा विभागाकडील सर्व अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जलशुध्दीकरण केंद्र व पंपिंग तसेच वितरण विभाग यांनी याची नोंद घेऊन वरील नमूद कालावधीमध्ये पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.




