संशोधक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

‘बार्टी’कडून पीएच. डी. अधिछात्रवृत्ती (शैक्षणिक वर्ष 2023 बाबत ) संशोधक विद्यार्थ्यांसाठी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF) योजना सन 2013 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने सर्वंकष धोरण निश्चित केले आहे. सदर धोरणानुसार, दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी कायमस्वरूपी नोंदणी (Permanent Registration) झालेल्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांकडून पीएच.डी. अधिछात्रवृत्ती शैक्षणिक वर्ष 2023, 2024 व 2025 करिता दिनांक 01 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

वयोमर्यादेबाबत महत्त्वाची सूचना
बार्टी, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023 करिता दिनांक 01 जून 2023 रोजी संशोधक विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे, अशी अट नमूद करण्यात आली होती. तथापि पीएच.डी अधिछात्रवृत्ती वर्ष 2023 करिता वयोमर्यादा 45 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 01 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी कायमस्वरूपी नोंदणी झालेल्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांसाठी सदर वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येत आहे.त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2023 करिता पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या अर्जासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात येत आहे.
सदर वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ फक्त शैक्षणिक वर्ष 2023 करिता दिनांक 01 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत पीएच.डी.साठी कायमस्वरूपी नोंदणी झालेल्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांना लागू राहील.
तरी पात्र संशोधक विद्यार्थ्यांनी वरील बाबींची नोंद घेऊन बार्टी, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून दिनांक 15/09/2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन मा. महासंचालक, बार्टी, पुणे यांनी केले आहे.



