पुण्यात डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत पाच मार्गांवर मेट्रो धावणार

पुणे : पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने २०२१ हे वर्ष अतिशय चांगले जाणार असल्याचे दिसत आहे कारण, डिसेंबर अखेरपर्यंत पुण्यात पाच मार्गांवर मेट्रो धावणार आहेत, तर मार्च मधे ट्रायल रन सुरु होतील व वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर ऑगस्ट पर्यंत मेट्रो धावेल, असा विश्वास पुणे मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. . कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर शहरातील विकासकामांचा आमदार चंद्राकांत पाटील यांनी आज आढावा घेतला. त्यांनी पुणे शहर मेट्रो प्राधिकरणासोबत बैठक घेऊन मेट्रोच्या कामाची सविस्तर माहिती घेतली. Metro will run on five routes in Pune till the end of December 2021
या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार मुक्ता टिळक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे सर्व आधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, पुणे मेट्रोबाबत अतिशय समाधानकारक चित्र असून, पाच मार्ग डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करुन त्यावर मेट्रो धावू शकेल, तर त्यातील एक मार्गावर मार्चपासून मेट्रो धावू शकेल, असा मेट्रो अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्याशिवाय कोथरुडमधील नळस्टॉप चौकातील डबल डेकर उड्डाणपूलाचे कामही अतिशय वेगाने सुरु असून, जून २०२१ पर्यंत तो पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होईल, असाही दावा मेट्रो प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे मेट्रो आणि उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यास पुण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.






