कोरोना रूग्ण संख्या वाढतीय, कठोर निर्णय घ्यावे लागतील; अजित पवारांचे संकेत

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे. त्यामुळं या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात डिसेंबरनंतर रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 4 हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून आले.(As the number of corona patients increases, tough decisions will have to be made; Ajit Pawar’s hints)
रविवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 4092वर पोहोचला होता. त्यामुळं ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली. परिणामी कोरोना रुग्णसंख्येचा हाच वाढता आलेख पाहता नागरिकांनीही कठोर निर्णयाच्या तयारीत राहावं असे संकेत अजित पवार यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी बैठक घेऊन यामध्ये चर्चेतून काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, त्यासाठी नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी असं पवारांनी नागरिकांना उद्देशून स्पष्टपणे सांगितलं. काही गोष्टींच्या बाबतीत वेळीच निर्णय न घेतल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं म्हणत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीला मिळालेल्या गंभीर वळणाचं चित्र जनतेपुढं ठेवलं.



दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या फरकानं वाढू लागली आहे. अमरावतीमध्ये याच धर्तीवर 28 फेब्रुवारीपर्यंत गर्दी टाळण्यासाठी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये दुकानं मात्र सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, हे प्रमाण असंच राहिल्याल लॉकडाऊनची आवश्यकता तूर्तास नाही असं म्हणाणाऱ्या शासकीय यंत्रणांना नाईलाजानं काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत याचीच दाट शक्यता आता दिसू लागली आहे.



