गेल्या पाच तासांपासून कोथरूडमधील सोसायट्यांमध्ये पावसासोबत ड्रेनेजचे पाणी; महापालिकेची टाळाटाळ दुर्गंधीने रहिवाशी हैराण

पुणे : सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूडमधील एकलव्य डीपी रस्त्यावरील बधाई चौकातील निसर्ग सुंदर,माथवड बिल्डिंग आणि परिसरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये पावसाच्या पाण्या सोबतच ड्रेनेज चे पाणी शिरल्याने नागरीक हैराण झाले आहेत. गेल्या पाच तासांपासून नागरीक हे पाणी काढण्यासाठी महापालिकेला तक्रार करीत आहेत.
मात्र महापालिकेकडून ऊद्या सकाळी कामगार आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. असे उत्तर देण्यात येत आहे. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना देखील विनंती केली. मात्र त्यांच्या कडूनही ऊद्या सकाळी च काम होईल असे उत्तर मिळाले. यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावले. मात्र त्यांच्याकडे पाणी काढण्यासाठी पंप उपलब्ध नसल्याने काम होणे अवघड झाले.
याबाबतीत बोलताना स्थानिक नागरिक योगेश माथवड म्हणाले, महापालिकेकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणून यंत्रणा हवी आहे. मात्र कोरोनाचे कारण देउन टाळाटाळ केली जात आहे. पावसाच्या पाण्या सोबत मलनिस्सरण वाहिनीचे पाणी आमच्या पार्किंग मध्ये शिरले आहे. तसेच पाण्याच्या टाकी मध्ये ही शिरले असल्याने आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पुर्ण रस्त्यावरून हे घाण पाणी वाहत आहे. तातडीने यावर उपाययोजना करण्यात आली पाहिजे.
स्थानिक नागरीक अविनाश देशमुख म्हणाले, गणंजय सोसायटी येथील माथवड बिल्डिंग चौकातील मेनरोड वरील ड्रेनेज मधील सांडपाणी बाहेर आल्याने माथवड बिल्डिंग,निसर्ग सुंदर, ओमकार अपार्टमेंट या सोसायटीत पार्किंग मधे पूर्ण पाणी साचले आहे.हे सर्व सांडपाणी माथवड बिल्डिंग ते छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापर्यत गेले आहे.







