राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला..

पेट्रोल दरवाढीवरून राजकारण तापले..
मुंबई : पेट्रोल कंपन्यांनी आज पेट्रोलचे 29 पैशांनी तर डिझेलचे २६ पैशांनी प्रतिलिटर दर वाढवले. आजच्या दरवाढीनंतर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. या महिन्यात तब्बल १६ वेळा दरवाढ झाली आहे. या दरवाढीवरून आता राजकारण तापताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याने पेट्रोल वरील कर कमी करावा अशी मागणी केली आहे. या त्यांच्या विधानावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. The state does not get money by selling companies like the center government : Rohit Pawar
याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करताना म्हंटले आहे की, राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर आहे.

असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रुपयांची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे. असे म्हणत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.



