पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे महापालिकेच्या विविध विभागाकडून मदत पथके रवाना ; मुरलीधर मोहोळ

पुणे : राज्यातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही विविध विभागातील पथके कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, रायगड या ठिकाणी मदतीसाठी पाठवली असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Relief teams sent from various departments of Pune Municipal Corporation to help the flood victims; Muralidhar Mohol
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका येथे आपत्ती व्यवस्थपान अंतर्गत मदतीसाठी सात जेटिंग आणि दोन ग्रॅबींग मशीन पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमध्ये जलशुद्धीकरणाचे काही केंद्रे बंद आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे आव्हानात्मक आहे. त्यात कोल्हापूर महानगरपालिकेकडील टँकर संख्या अपुरी असल्याने अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाचे १७ टँकर कोल्हापूरला रवाना केले आहेत. टँकर्ससोबतच निरीक्षक, इलेक्ट्रिशियन असे एकूण २१ जण कोल्हापूरला पाठवण्यात आले असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

तसेच रायगड येथे झालेल्या महापुरानंतर लोकांच्या आरोग्याचा विचार करून पुणे महानगरपालिकेची 11 जणांची आरोग्य टीम रायगडकडे रवाना होत आहे. यात डॉक्टर्स,नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.साधारण एक आठवड्याच्या कालावधीसाठी ही टीम पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.









