प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप नैराश्यातून ; संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

पुणे : pune city अमेनिटी स्पेसच्या विषयावरून राष्ट्रवादीत माजलेले रणकंदन, स्थायी समिती सदस्यांसह पक्षादेश धुडकावणारे नगरसेवक आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागलेला पराभव, यामुळे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैफल्यग्रस्त झाले असून आपले अपयश लपविण्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत अशी घणाघाती टीका भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
खर्डेकर यांनी म्हंटले आहे की, वस्तूत: भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने पुणे शहरात कामांचा धडाका लावला असून 2017 च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आणली आहेत. कोरोनाच्या संकटकाळात अभूतपूर्व सेवाकार्य करणारे भाजपचे लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागात सामान्य पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. एवढेच नव्हे तर पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न देखील साकार होतं आहे. अश्या परिस्थितीत येत्या मनपा निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा भाजपला पसंती देतील हे लक्षात आल्यामुळे प्रशांत जगताप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करत आहेत, मात्र या प्रयत्नात आपलेच हसू होतं आहे हे त्यांच्या लक्षात येत नसावे.
खरेतर राजकीय सभ्यतेनुसार त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या नेत्यांवर टीका केली तर एकवेळ समजून घेता येईल पण थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर आरोप करताना त्यांना सभ्यतेचे ही भान राहिलेले नाही. राज्यात त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या महाविकास आघाडी चे सरकार आहे आणि हे सरकार कश्या पद्धतीने सुडाचे आणि गलिच्छ राजकारण करत आहे ते केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणात देशाने बघितले आहे, त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेतील कोणत्याही विषयाची चौकशी करायची असेल तर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून खुशाल करावी त्यास आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊच, मात्र ते करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करताना त्यांनी संयम बाळगावा असा सल्ला संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.
विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील असेही खर्डेकर म्हणाले.आपल्याच पक्षातील ज्येष्ठ अश्या खासदार वंदना चव्हाण यांच्या निर्णयांचा अनादर करणारे प्रशांत जगताप महापौर राजीनामा देणार होते असा कापोलकल्पित दावा करतात हे हास्यास्पद असल्याचे ही खर्डेकर म्हणाले. प्रशांत जगताप यांचा केवळ प्रसिद्धी साठी सारा खटाटोप असून मोठ्या नेत्यांवर बोलले की वारेमाप प्रसिद्धी मिळते आणि आपले अपयश ही झाकता येते असा त्यांचा गैरसमज झाला आहे, ह्या कल्पनाविलासातून त्यांनी लवकर बाहेर यावे वा काहीतरी सकारात्मक कार्य करावे असा सल्ला खर्डेकर यांनी दिला आहे.







