कोथरूडमधील महिलेला 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यास अटक

कोथरूड : पोलिसांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्याच्या बदल्यात तक्रारदार महिलेकडेच 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट याला गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशीरा अटक केली.
याप्रकरणी सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्यासह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोथरूड येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीवर 2018-2020 मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयाबाबत फिर्यादी यांनी आल्हाट याच्याकडे संपर्क केला होता.
त्यावेळी आल्हाट याने डेक्कन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज करा. तुम्हाला त्रास दिल्याचे आठ दिवसांत पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. मी आत्तापर्यंत 32 अधिकारी निलंबित केले असल्याचे फिर्यादींना सांगून उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द त्याने लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले होते.







