एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही: अनिल परब

मुंबई : एसटीच्या बडतर्फ कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही, असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे कामगारांप्रती आमचे दायित्व आहे तसेच जनतेप्रतीही आहे, त्यामुळे ही कारवाई ताबडतोब मागे घेणार नाही, असे अनिल परब यांनी विधानसभेत बोलताना सांगितले आहे. ”सरकार म्हणून हातावर हात ठेवून आम्ही बसू शकत नाही. बडतर्फची कारवाई झाली की त्याला पुन्हा एक प्रक्रिया आहे. आम्ही लगेच बडतर्फीची कारवाई मागे घेऊ शकणार नाही. कारण आम्ही कारवाया मागे घेत असताना कामगार कामावर येत नाही आहेत. आमच्यावर कोणताही कारवाई होणार नाही असा कामगारांचा समज झाला आहे,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
“एसटी पूर्ण क्षमतेने सुरु होईल तेव्हा पुढच्या कारवायांसंबंधी निर्णय घेतला जाईल. पण आत्ता मी बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांवरील कारवाई मागे घेणार नाही,” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.




