‘ट्विटर वॉर’ रंगले : मिलिंद नार्वेकर विरूद्ध नारायण राणे

पुणे : भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे सचिव मलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटर वॉर सुरु असल्याचं चित्र आहे. राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा ‘मातोश्री’मधील ‘बॉय’ असा उल्लेख केला होता. तसेच कोण मिलिंद नार्वेकर? असा सवाल करत खिल्ली उडवली होती. त्यांच्या या टीकेला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर उत्तर दिलं. त्यानंतर हे ट्विटर वॉर रंगले.

स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? असा खोचक सवाल नार्वेकरांनी केला होता. त्यांच्या या सवालावर नारायण राणेंनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं. सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नारायण राणे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”, असा सवाल करत नार्वेकरांनीदेखील नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.तसेच नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अॅक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.



