पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते शाम देशपांडे यांनी लावलेल्या फ्लेक्स मुळे राजकीय वर्तुळात चर्चा..

शाम देशपांडे यांनी सांगितले फ्लेक्स लावण्यामागचे कारण
( अमोल साबळे)
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व मेट्रोचे लोकार्पण होणार आहे, तसेच कोथरूड मध्ये त्यांची सभा होणार आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले आहेतच परंतु एका शिवसेना नेत्याने नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेना नेते शाम देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावल्याने आगामी महापालिका निवडणुकीत देशपांडे भाजपात प्रवेश करणार काय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देशाचे कणखर विकासपुरुष नरेंद्र मोदी यांचे कोथरूडकरांच्या वतीने हार्दिक स्वागत अशा आशयाचा फ्लेक्स देशपांडे यांच्याकडून कर्वे रस्त्यावर लावण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकीय युद्ध सुरू असताना शहरातील शिवसेना नेत्याने लावलेल्या या फ्लेक्समुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
पुणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असल्याने अनेक राजकीय नेते आपली राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न करत आहेत. तीनच्या प्रभाग रचनेत आपल्या पक्षाकडून राजकीय गणित जुळत नसेल तर अनेक जणांकडून त्या प्रभागात प्रभाव असणाऱ्या इतर पक्षांच्या विचार केला जात आहे व त्यादृष्टीने प्रयत्न ही सुरू आहेत.
शाम देशपांडे यांनी लावलेल्या या फ्लेक्स मुळे शाम देशपांडे आगामी महापालिका निवडणुकीत काही वेगळा निर्णय घेणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला येऊ लागला आहे. कोथरुड परिसरात तर याची जोरदार चर्चा आहे.
या संदर्भात शाम देशपांडे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ५० ते ६० वर्षापूर्वी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा कोथरूडला आले होते, त्यावेळी मी नव्हतो त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोथरूडमध्ये येत आहेत. अतिथी देवो भव: या हिंदू संस्कृतीनुसार त्यांचं कोथरुडकरांच्या वतीने स्वागत करणं हे कर्तव्य मानून मी स्वागताचा फ्लेक्स लावला आहे. यानंतर पुढचे पंतप्रधान आपल्या कोथरुडमध्ये कधी येतील, तेव्हा आपण असू की नसू हे आपल्याला माहीत नाही. उद्या जर पंतप्रधान मेट्रो उद्घाटनाच्या चांगल्या कामासाठी येत असतील तर त्यांचं स्वागत होण गरजेचं आहे. यात राजकारणाचा कोणताच भाग नाही असं त्यांनी सांगितलं आहे.









