२० हजाराच्या फोनला ८४ हजाराचं लोन ; हफ्ता कट झाल्यावर कळलं फसवणूक झाल्याचे.. कोथरूड मधील प्रकार

पुणे : विजय सेल्स या नामांकित इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मॉल मधून एका व्यक्तीने 20000 मोबाईल लोन करून घेतला. मॉल मधील फायनान्स करायला बसलेल्या एका बँकेने वीस हजाराच्या मोबाईल साठी 84000 लोन केले.मात्र ही गोष्ट संबंधित ग्राहकाच्या पगारातून हफ्ता कट होऊन गेल्यानंतर त्याच्या लक्षात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशा दोन ग्राहकांनी संबंधित मॉल व बँकेकडे धाव घेतली व याबाबत कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
शंकर सखाराम तोंडे हनुमाननगर कोथरूड व दिपाली रामदास येवले अशी फसवणूक झालेल्या दोन ग्राहकांची नावे असून त्यांनी या फसवणुकीबाबत कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. या प्रकारामुळे लोन करून कोणतीही वस्तू घेताना सर्व प्रक्रिया चौकस पणे करणे गरजेचे असल्याचे पुढे आले आहे.
विजय सेल्स सारख्या ठिकाणी असा प्रकार घडत असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे. अशा पद्धतीने गरीब कुटुंबातील लोकांची फसवणूक होणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे याचा तपास करून दोषींवर पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी व फसवणूक झालेल्या व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली आहे.
शंकर सखाराम तोंडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे ते त्यांच्या मुलीसाठी मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी विजय सेल्स या कोथरुडमधील दुकानात गेले. त्याठीकाणी 20000/- रुपयांचा फोन लोन करुन घेतला. त्याकरिता विजय सेल्स मधील मॅनेजर आणि IDFC बँकेचे प्रतिनिधी यांनी माझे कागदपत्र घेऊन ऑनलाईन पद्धतीने लोनची प्रक्रिया केली. मला मोबाईलवर ओटीपी आला पण इंग्रजी वाचता न आल्याने मला समजले नाही. तोंडे यांच्या नावे 84899/- चे लोन IDFC बँकेने करुन घेतले हे त्यांना सांगण्यात आले नाही. जनता सहकारी बँकेत पगार जमा झाला त्यावेळी जनता खात्यातून 10237/- रुपये कट झाले त्यावेळी हा प्रकार लक्षात आला.
हे कळल्यानंतर त्यांनी IDFC बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांनी विजय सेल्स मध्ये जाऊन चौकशी करा असे सांगीतले. त्यानुसार तोंडे विजय सेल्स मधील मॅनेजर ला भेटले. त्यांनी तोंडे यांना प्रतिक्षा चौरे हिचा नंबर देतो तिला फोन करा असे सांगितले. त्यानंतर तोंडे यांनी प्रतीक्षा चौरे हिला फोन केल्यानंतर तिने सांगितले की तुम्ही दुकानात गाजावाजा करु नका तुम्ही खाली या मी तुमच्या बँकेत सर्व पैसे जमा करते. माझ्या हाताने हे चुकुन झालेले आहे आणि चौरे हिने IDFC बंकेत पैसे जमा केले. त्याच दिवशी 6 वाजता माझे 9765/- रुपये जनता सहकारी बँकेत जमा केले. आणि 472 रुपये IDFC बँकेने कट
करुन घेतले.
तोंडे यांच्या प्रमाणेच दिपाली रामदास येवले यांचीही फसवणूक झाली आहे. त्यामुळे एक सारख्या घटना दोघांच्या बाबतीत कशा घडल्या. 20 हजाराच्या मोबाईल साठी बँकेने 84 हजार 899 रुपयांचे लोन कसे केले. या पाठीमागचे नक्की धागेदोरे काय याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. असे दोघांच्याच बाबतीत झाले आहे की आणखी इतरांच्या बाबतीत घडले हे पहावे लागणार आहे.

दिपाली येवले यांनी सांगितले की, मी ९ हजाराचा मोबाईल घेतला पण त्यासाठी ६५ हजाराचे लोन केले. हप्ता कट झाल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. बँकेत संपर्क केल्यानंतर मोबाईलचं लोन असल्याचं सांगितलं. त्या मुलीचा नंबर मिळवून तिला फोन केला तर तिने माझ्या नावावर केलेल्या लोन मधून ॲपल चा मोबाईल घेतल्याचे कळले. तिला बोलल्यानंतर ती म्हणली तुमची फसवणूक करणार नाही. मी काम सोडले आहे. तुमचे सगळे पैसे जमा करते. ती भेटायला येणार होती पण आली नाही. त्यानंतर तिचा फोन ही बंद लागतोय. आमच्या अज्ञानाचा फायदा घेतला असून आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.



