पुणे शहर

या कारणास्तव गोसावी वस्ती मधील नागरिक विकसकावर संतप्त ; बैठकीत नागरिकांचा आक्रोश

पुणे: कर्वेनगर मधील सर्व्हे नंबर २५/१ गोसावी वस्ती येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात संबंधित विकासकाकडून अनेक अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप केला जात असून वस्तीमधील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेताळ मंदिराचा रस्ता ही बंद केल्याने नागरिकांच्या मनामध्ये संतापाची भावना आहे.

आज राष्ट्रवादीचे नेते विजय डाकले यांच्या समवेत येथील नागरिकांची वेताळ बाबा मंदिरात बैठक झाली. या बैठकीत विकसक ज्या पद्धतीने नागरिकांशी वागत आहे त्याबाबत रोष व्यक्त करण्यात आला. तसेच एसआरए अधिकारी येथील नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी संजय चव्हाण, सतीश चव्हाण, शाम चव्हाण, छबू चव्हाण, रोशन चव्हाण व इतर नागरिक उपस्थित होते.

यावेळी विजय डाकले म्हणाले, संबंधित मे. ग्रेस डेव्हलपर्स हे विकसक येथील नागरिकांचे भक्तिस्थान असलेल्या वेताळ बाबाच्या मंदिराचा रस्ता बंद करून त्यांच्या भावनांशी खेळत असून हे सहन केले जाणार नाही. येथील झोपड्यांच्या असणाऱ्या मूळ संख्येत दुपटी तिपटीने वाढ करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार केला जात असताना एसआरए विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. कोथरूड सारख्या भागात बाधित झोपडी धारकांना भाड्याने राहण्याकरिता ५ हजार रुपये एवढे तुटपुंजे भाडे दिले जात असून तेही वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत एस आर ए कडे अनेकवेळा अर्ज करून देखील त्याला उत्तर न देता विकसकाला पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप डाकले यांनी यावेळी केला. येथील नागरिकांचे म्हणणे ऐकुन त्यांना न्याय दिला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या संदर्भात उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र २
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वैशाली इंदानी – उंटवाल यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये