पुणे शहर

पुणे महापालिका निवडणूकीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ च्या भूमिकेत कार्यकर्ते.. नेत्यांची डोकेदुखी वाढणार ; बंडाळीचा फटका बसणार…

(अमोल साबळे)

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी जोरात कामाला लागले असून ‘अभी नहीं तो कभी नहीं’ च्या भूमिकेत कार्यकर्ते दिसत आहेत. ही निवडणूक  कोणत्याही परिस्थितीत लढविण्याची मानसिकता कार्यकर्त्यांनी केल्याचे दिसत आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांनंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या पण निवडणुका पुढे गेल्या आणि महापालिकेत प्रशासक आले. आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून जानेवारी २०२६ मध्ये निवडणुका होतील असे दिसत आहे. म्हणजे २०१७ मध्ये संधी चुकलेल्या कार्यकर्त्यांना साधारण ९ वर्षांनंतर निवडणुक लढवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता थांबायचं नाही काही झालं तरी आता आर पार ची लढाई लढायची अशी तयारी कार्यकर्ते करत आहेत.  नगरसेवकांचे काम करणारे कार्यकर्तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असून या कार्यकर्त्यांच्या बंडाची धास्तीही माजी नगरसेवकांना असल्याचे चित्र आहे.

Img 20250508 wa00015038950216212096978

नेत्यांच्या वाढदिवसाचे फलक लावणे, कोणाची अडचण असल्यास त्याच्या मदतीला धावणे, आपल्या भागातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणे, पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवणे अशा प्रकारची अनेक कामे सामान्य कार्यकर्ता करत असतो. पण निवडणुकीला फक्त नेत्यांचा आणि त्यांच्या जवळच्यांचाच विचार होणार असेल तर एवढे करूनही शेवटपर्यंत खितपतच पडायचे का? असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. आतातरी पक्ष आपल्याला संधी देईल का ? अशा विवंचनेत सध्या हे कार्यकर्ते असून ही निवडणूक काही झाले तरी लढवायची असा चंग बांधून सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारी नाही मिळाल्यास सच्चा कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका पक्षांना बसू शकतो हे नक्की आहे.

प्रभागांमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे चित्र दिसत असून वरिष्ठ पातळीवर जरी नेतेमंडळी एकत्र येऊन राजकीय गणिते मांडत असली तरी तळागाळापर्यंत पोहपचलेल्या कार्यकर्त्यांचाही विचार चारच्या प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत पक्षाला करावा लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक ताकदीचा विचार नेतेमंडळींना करावा लागणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडूनच आयात उमेदवार लादले जातात. पण आयात होऊन आलेल्या उमेदवारांमुळे पक्षातील कार्यकत्यांवर अन्याय होत असतो. अशा वेळेस त्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत या निवडणुकीत करावी लागणार आहे. सध्या नेत्यांच्या हालचालीचा अंदाज घेऊन कार्यकर्ता आपली राजकीय गणिते तयार करू लागला आहे. ऐनवेळेस पक्षाची उमेदवारी दुसऱ्यालाच जाण्याचा अनुभव कार्यकर्त्यांना काही नवा राहिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्ता सावधानता बाळगूनच घोडदौड करत आहेत.

कामाला लागा असे प्रत्येकालाच जरी सांगितले गेले असले तरी उमेदवारीची माळ गळ्यात कोणाच्या पडणार याबाबतची शंका कार्यकर्त्यांच्या मनात अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असते. कारण शेवटच्या क्षणीही काही धोका होऊ शकतो याची त्याला कल्पना असते. अनेक निवडणुकांचे काम करत असताना त्याने असे प्रकार पाहिलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक म्हणजे शेवटची संधी आहे. त्यामुळे थांबण्याच्या मनस्थितीत कोणता कार्यकर्ता दिसत नाही. त्यामुळे पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्याला आता न्याय मिळणार का पुन्हा त्यांच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येणार हे पाहावे लागणार आहे.

प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत या दोन महत्वाच्या प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. पुढील निवडणुकीची प्रक्रिया बाकी आहे. साधारण जानेवारीत निवडणुका होतील असे चित्र आहे. दोन महिन्यांचा कालावधी कार्यकर्त्यांच्या हातात आहे. अजून बरेच पाणी जमिनीखालून जायचे आहे. युत्या, आघाड्या यांचे चित्र स्पष्ट व्हायचे आहे. परंतु निवडणूक लढवायची मनात खुनगाठ बांधलेला कार्यकर्ता सर्व शक्यतांचा विचार करून आपली रणनीती आखत आहे. पक्षाकडून अन्याय झालाच तर काय करायचे याचा विचार करून पुढची तयारी त्यांनी ठेवली असल्याचे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.

Fb img 17575688025518630244243602003405

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये