फ्लेक्स लावणाऱ्या इच्छुकासह पक्षावर होणार आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पुणे : आचारसंहिता लागू झाल्याने कोणतेही जाहिरात फलक लावताना इच्छुक उमेदवारांनी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत जागोजागी मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी देवदर्शनाच्या सहलीसह महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याची माहिती देणारे फलक जागोजागी लावले आहेत.
आचारसंहिता सुरु असल्याने असे फलक लावताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच जाहिरात फलकावर राजकीय पक्षाच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचा संपूर्ण खर्च संबधित राजकीय पक्षाच्या निवडणूक खर्चात लावला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त आणि महापालिका मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे शहरात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील विविध भागात राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून लावण्यात आलेले जाहिरात फलक काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या वतीन नक्की काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती देण्यासाठी महापालिका आयुक्त राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यामध्ये सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यावेळी उपस्थित होते.
आयुक्त राम म्हणाले, महापालिकेची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने नियोजन केले आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या आणि इतर इच्छुक उमेदवारांनी जाहिरात फलक लावलेले आहेत. यामध्ये मोफत अष्टविनायक यात्रा, धार्मिक यात्रा, उज्जैन महाकाळ दर्शन यासह खेळ पैठणीचा असे उपक्रम राबविले जात आहेत. पुढील काही दिवसांमध्ये या सहली काढल्या जाणार आहेत. महिला वर्गसाठी मोफत लकी ड्रॉ च्या माध्यमातून विमानाने परदेशवारी अशा सहली देखील काढल्या जात आहेत. निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्याने अशा जाहिराती करताना त्या रस्त्यांवर, चौकांमध्ये तसेच प्रभागांमध्ये लावताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.



महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्या इच्छुकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच या जाहिरात फलकांवर ज्या राजकीय पक्षांचे संबधित इच्छुक असतील त्याचा खर्च राजकीय पक्षाच्या खर्चात दाखविण्यात येईल. याबाबत सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या इच्छुकांचे फलक काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबधित व्यक्तीचे फलक दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक संनियंत्रित समिती, भरारी पथके, तक्रार निवारण कक्ष, जागोजागी तपास करण्यासाठी चेक पोस्ट पथक, निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या महत्वाच्या घटना, प्रचार फेऱ्या, नेत्यांच्या सभा, अवाजवी खर्च यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हीडीओ चित्रीकरण पथक तयार केले जाणार आहे. तसेच आचारसंहिता भंगाची तक्रार स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष कक्ष देखील स्थापन केला जाणार आहे, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.



