निष्कारण सायरन वाजविल्यास रुग्णवाहिका चालकांवर दंडाची कारवाई होणार…

पुणे – रुग्णवाहिकांचे सायरन निष्कारण वाजविल्यास एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी घेतला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.(Ambulance drivers will be penalized if the siren is sounded without any reason)
डॉक्टर जगदीश हिरेमठ यांनी आमदार शिरोळे यांना सुचविले की गर्दी नसतानाही तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहतूक नसतानाही रुग्णवाहीकांचे चालक अकारण हॉर्न वाजवतात आणि सोबत सायरन सुरु ठेवतात. त्यामुळे सध्या साथीच्या काळात लोकांच्या मनात अकारण भिती निर्माण होऊन नैराश्य येते. त्याचा परिणाम वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. ही बाब आमदार शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले.

अकारण सायरन वाजविणाऱ्या रुग्णवाहिकेविरुद्ध ध्वनी प्रदुषण करीत असल्याने मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९०(२) आणि कलम १९४एफ नुसार चालक वा मालक यांच्यावर प्रथम गुन्ह्यासाठी प्रत्येकी रुपये हजार आणि द्वितीय व त्यापुढील गुन्ह्यासाठी रुपये दोन हजार दंडाची कारवाई करण्यात यावी असे प्रादेशिक परिवाहन अधिकारी अजित शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.









