पुणे शहर

अमली पदार्थ विरोधी लढा सर्वसमावेशक व्हावा : पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत


पुणे : अमली पदार्थ हा राक्षस आता अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला असून हा शत्रू दिसत नसल्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर आहे. पूर्वी तरुण पिढीला लक्ष्य करणारा हा राक्षस आता शालेय पिढीला लक्ष करत आहे. त्यामुळे या विरोधात लढण्यासाठी पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्था, पालक, शिक्षक, समुपदेशक, मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या लढायला आता व्यापक स्वरूप येण्यासाठी तो सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भोई प्रतिष्ठान आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी या दृष्टीने समाजासमोर स्तुत्य आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अशा वाटचालीत नेहमीच अग्रेसर राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी व्यक्त केले.


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भोई प्रतिष्ठान पुणे , महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने
से नो टू ड्रग्स अँड से येस टू लाइफ” या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी शारदा राऊत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या प्रश्नावर लढण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे आणि या दृष्टीने ही कार्यशाळा पथदर्शी प्रकल्प ठरेल. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक  प्रवीण पाटील, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई, जाधवर इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दुल जाधवर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.


रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभीराम घड्याळ पाटील यांनी याप्रसंगी बोलताना अशा प्रकारच्या उपक्रमांच्या पाठीशी प्रबोधिनी नेहमीच उभी राहील, या सर्वांचे प्रशिक्षण घेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले.


भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अमली पदार्थविरोधी मोहिमेचे प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी बोलताना या प्रश्नांची दाहकता ही अजूनही समाजाला तेवढी जाणवत नाहीये ही दुर्दैवी गोष्ट असून या त्यासाठी प्रतिबंध आणि जनजागरण अशा दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज असल्याने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या प्रश्नाची गंभीरता विद्यार्थ्यांना समजण्यासाठी याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होण्याची गरज असून महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवला.


या कार्यशाळेमध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, पालक ,शिक्षक, समुपदेशक, शिक्षण संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी अमली पदार्थ आणि शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन यांनी कॉर्पोरेट जगातील अमली पदार्थाचा शिरकाव, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रताप परदेशी यांनी अमली पदार्थ विरोधी कायदा , समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर यांनी अमली पदार्थ विरोधात शिक्षक पालक आणि समुपदेशकांची भूमिका, महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थविरोधी टास्क मोहिमेचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यात पोलिसांची भूमिका या विषयावर संवाद साधला.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागरणाची चित्रफीत आणि प्रेझेंटेशन विविध शाळा आणि कॉलेजेसमध्ये दाखवण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत यांनी सर्वांना अमली पदार्थ विरोधी शपथ दिली.
या कार्यशाळेमध्ये मान्यवरांनी आणि सहभागींनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवरून अमली पदार्थ विरोधी विरोधात काम करण्यासाठी आवश्यक अभ्यास अहवाल तयार करण्यात येणार असून त्याचे सादरीकरण शासनाला, गृह मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यालयीन अधीक्षक राहुल टोकेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये