महाराष्ट्र

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अहमदनगरमध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल करून ४८ तास उलटले तरीही आरोपींविरोधात काहीही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

अहमदनगर शहरातील सिताराम सारडा विद्यालयात हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेलगत असणाऱ्या सिगारेट, तंबाखू विक्रीच्या बेकायदेशीर पानटपर्‍या हटविण्यासाठी कुलकर्णी यांनी प्रयत्न केले हाेते. त्याचा राग मनात धरुन अज्ञातांनी हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्याना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. तसेच हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे त्यांना आश्वस्त केले.

खासदार सुप्रिया प्रिया सुळे यांनी X वर पोस्ट लिहिली असून त्या म्हणतात की, “भाजपाच्या शासनकाळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन झाले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना अतिशय संतापजनक आहे. समतेच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली. हे अतिशय चिंताजनक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. त्यांचे गृहखात्याकडील अक्षम्य दुर्लक्ष सामान्यांच्या जीवावर बेतत आहे. सीसीटीव्हीत हल्लेखोर दिसत असतानाही आतापर्यंत त्यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. या गुंडांना कोण अभय देतेय याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे. या घटनेतील हल्लेखोरांना तातडीने गजाआड करा. या हल्ल्याचा तीव्र निषेध!”

हेरंब कुलकर्णी याबाबत म्हणाले की, “मला चार टाके पडले आहेत. दुसरा फटका मित्रांनी हाताने अडवला. त्यामुळे दुसरा वार वाचला. शनिवारीच जाऊन तक्रार दाखल केली होती. परंतु, ४८ तास उलटून गेले तरी कारवाई झाली नाही. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देण्यात आली.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये